सामना जिंकला, पण जीव गमावला! मुरादाबादचा अनुभवी गोलंदाज मैदानावरच कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:39 IST2025-10-13T17:38:08+5:302025-10-13T17:39:17+5:30
उत्तर प्रदेशात क्रिकेट खेळत असताना एका अनुभवी गोलंदाजाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सामना जिंकला, पण जीव गमावला! मुरादाबादचा अनुभवी गोलंदाज मैदानावरच कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
UP Accident: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये क्रिकेटच्या मैदानावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका गोलंदाजाने आपल्या संघाला शेवटच्या क्षणी रोमांचक विजय मिळवून दिल्यानंतर त्याला मृत्यूने गाठलं. विजयानंतर गोलंदाजाचा शेवटची ओव्हर पूर्ण करताच मैदानावर मृत्यू झाला. विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी संपूर्ण मैदानावर शोकाकूल वातावरण निर्माण झाले. सहा फूट उंची, हाय आर्म गोलंदाजी अहमर खान गोलंदाजी करताना फलंदाजाला चेंडू कुठून येतो हे कळायचे नाही. तरुणपणी अहमर खानने अनेक महान खेळाडूंना फसवून विकेट घेतल्या. पण ते रणजी खेळू शकला नाही हे दुर्दैवी होते.
मुरादाबादच्या बिलारी ब्लॉकमधील शुगर मिल मैदानावर ही घटना घडली. यूपी वेटरन्स क्रिकेट असोसिएशनतर्फे रविवारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुरादाबाद आणि संभल या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. शेवटच्या षटकात संभल संघाला विजयासाठी १४ धावांची गरज होती. मुरादाबादकडून डावखुरे गोलंदाज अहमर खान हे संघासाठी निर्णायक शेवटचे षटक टाकण्यासाठी आले. त्यांनी अत्यंत नियंत्रित गोलंदाजी करत केवळ २ धावा दिल्या आणि आपल्या संघाला ११ धावांनी विजय मिळवून दिला.
मात्र, संघाला हा मोठा विजय मिळवून देताच, अहमर खान यांची तब्येत अचानक बिघडली. शेवटचा चेंडू टाकताच ते मैदानात जोरात कोसळले. मैदानावरील इतर खेळाडू आणि उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तात्काळ सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ ते प्रतिसाद देत असल्याचे वाटले, पण काही क्षणातच ते शांत झाले.
त्यानंतर तात्काळ अहमर खान यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अहमर खान हे अनुभवी गोलंदाज होते आणि एका औषध कंपनीत एमआर म्हणून काम करत होते.
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही मैदानावरच जीव गमावला आहे. अहमर खान त्यांच्या निधनामुळे मुरादाबादच्या क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेसच्या मृत्यूने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. फलंदाजी करताना त्याच्या हेल्मेटखाली एक बाउन्सर त्याच्या मानेवर लागला ज्यामुळे ब्रेन हॅमरेज झाले आणि तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. २००६ मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम राजा याचे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावर निधन झाले होते. १९९८ मध्ये ढाका क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागून भारतीय क्रिकेटपटू रमन लांबाचांही मृत्यू झाला. ते शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होते आणि त्यांनी हेल्मेट घातले नव्हते.