UP BJP MLA: बरेली येथील सर्किट हाऊसमध्ये उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री धर्मपाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीदरम्यान फरीदपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करुनही त्यांना वाचवता आले नाही.
बैठकीदरम्यान अचानक प्रकृती खालावली
सर्किट हाऊसमध्ये आज(दि.2) दुपारी पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान श्याम बिहारी लाल यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र काही क्षणांतच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. सभास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ वैद्यकीय मदत मागवली आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना मेडिसिटी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सीपीआरसह सर्व आवश्यक उपचार केले, परंतु काही वेळातच त्यांची निधन झाले.
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाने घातला घाला
या दुर्दैवी घटनेमुळे फरीदपूरसह बरेली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, श्याम बिहारी लाल यांनी कालच आपले समर्थक आणि जवळच्या सहकाऱ्यांसोबत साजरा केला होता. अनेकांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी निधनाची बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिक्षण आणि राजकारणात वेगळी ओळख
डॉ. श्याम बिहारी लाल फरीदपूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. ते केवळ राजकारणीच नव्हते, तर ते एक लोकप्रिय शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले रुहेलखंड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या साध्या, सौम्य आणि लोकाभिमुख स्वभावामुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय होते. फरीदपूर परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि थेट संपर्क ठेवणे, यासाठी ते विशेष ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणासह शिक्षण क्षेत्रालाही मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची श्रद्धांजली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले आहे की, “बरेलीच्या फरीदपूर विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांचे आकस्मिक निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना.” डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या पश्चात पत्नी मंजुलता, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
Web Summary : BJP MLA Dr. Shyam Bihari Lal passed away due to a heart attack during a meeting in Bareilly. He was rushed to the hospital but could not be saved. He died a day after his birthday.
Web Summary : बरेली में बैठक के दौरान बीजेपी विधायक डॉ. श्याम बिहारी लाल का दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। उन्हें अस्पताल ले जाया गया, लेकिन बचाया नहीं जा सका। उनका निधन उनके जन्मदिन के एक दिन बाद हुआ।