'स्टाफ डान्सर्सना वाचवत होता, आम्ही आत अडकलो'; गोव्यातील क्लब दुर्घटनेत कुटुंब गमावलं; वाचलेल्या महिलेचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:18 IST2025-12-11T19:13:17+5:302025-12-11T19:18:12+5:30
सुरक्षा नसलेल्या क्लब मालकांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितांनी केली आहे.

'स्टाफ डान्सर्सना वाचवत होता, आम्ही आत अडकलो'; गोव्यातील क्लब दुर्घटनेत कुटुंब गमावलं; वाचलेल्या महिलेचा आक्रोश
Goa Club Fire: गोव्यातील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर, वाचलेल्या आणि प्रत्यक्षदर्शी असलेल्या दिल्लीतील भावना जोशी यांनी क्लब व्यवस्थापनावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. क्लबमध्ये सुरक्षा उपायांचा अभाव असल्यानेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना जीव गमवावा लागला, असे त्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीच्या खजूरी खास येथे राहणाऱ्या भावना जोशी यांचे पती विनोद आणि तीन बहिणी या भयानक अग्निकांडात मृत्युमुखी पडल्या. ६ डिसेंबरच्या रात्री क्लबमध्ये बेली डान्स शो सुरू असताना, शोमध्ये वापरल्या गेलेल्या पायरोटेक्निकमुळे अचानक क्लबच्या छताला आग लागली, अशी माहिती भावना यांनी दिली.
"आम्ही डान्स फ्लोअरसमोर बसलो होतो. माझ्या पतीने सर्वात आधी आगीच्या ज्वाळा पाहिल्या आणि कर्मचाऱ्यांना त्वरित इशारा केला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता," असे त्यांनी सांगितले. डीजेने पाण्याच्या बाटल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण क्षणार्धात धुराचे लोट संपूर्ण हॉलमध्ये पसरले आणि सगळीकडे अंधार झाला.
'स्टाफ डान्सर्सना वाचवत होता, आम्ही आत अडकलो'
धुरामुळे आणि अंधारामुळे लोकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी सुरू झाली. भावना यांनी अत्यंत वेदनादायी अनुभव सांगितला, "मी माझ्या पती आणि बहिणींपेक्षा दोन-तीन पाऊले पुढे होते. तेव्हा मी पाहिले की बाऊन्सर आधी डान्सर्सना आणि संगीतकारांना बाहेर काढण्यात व्यस्त होते. धक्काबुक्कीमध्ये मी कुटुंबापासून वेगळी झाले आणि कशीबशी बाहेर पडले."
क्लबमध्ये केवळ एकच बाहेर पडण्याचा मार्ग होता, तसेच कोणतीही आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था नव्हतीय आग विझवण्यासाठी अलार्म किंवा इतर उपकरणे नव्हती, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अंधारात अनेक लोक बाहेर पडण्याऐवजी बेसमेंटकडे धावले, जिथे धूर अधिक असल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
भावना जोशी यांनी क्लब मालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. "इतक्या जणांना मारून टाकणारे मालक देशातून पळून गेले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे," असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, या घटनेनंतर फरार झालेले 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबचे मालक, गौरव आणि सौरभ लुथरा या बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. इंटरपोलने जारी केलेल्या ब्लू कॉर्नर नोटीसनुसार थायलंडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले असून, लवकरच त्यांना भारतात प्रत्यार्पित केले जाण्याची शक्यता आहे. गोवा पोलिसांनी आग लागल्यानंतर तत्काळ देश सोडून पळून गेल्याबद्दल ७ डिसेंबर रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
याशिवाय, क्लबच्या चार मालकांपैकी एक असलेल्या अजय गुप्ता याला दिल्लीतील साकेत न्यायालयाने ३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड दिल्यानंतर गोवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासानुसार, क्लबमध्ये फायर अलार्म, अग्निशमन उपकरणे नव्हती आणि फायर ऑडिटही झाले नव्हते. क्लब आवश्यक परवाने आणि परवानगीशिवाय सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने वागातोर येथील रोमियो लेन रेस्टॉरंटचा काही भाग पाडला आहे.