Unnao rape victim who was set ablaze in Unnao and airlifted to Safdarjung Hospital yesterday, died at 11:40 pm | Unnao Rape Victim : उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Unnao Rape Victim : उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10.40 वाजताच्या सुमारास पीडितेचे निधन झाले. 

बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला गुरुवारी सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. 

सफदरजंग रुग्णालयातील बर्न अ‍ॅण्ड प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शलभकुमार यांनी सांगितले की, "पीडितेला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र तिला वाचवू शकलो नाही. संध्याकाळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. रात्री 10.10 वाजता तिला हृदयविकाराचा झटका आला. आम्ही उपचार सुरू केले आणि तिला वाचविण्याचे संपूर्ण प्रयत्न केले. मात्र, रात्री 11.40 वाजता तिचे निधन झाले." 

पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या पीडितेवर मागील वर्षी बलात्कार झाला होता. दोन आरोपींपैकी एका आरोपीला दहा दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली  कोर्टात गुरुवारी होती. त्यासाठी उन्नावमधून रायबरेलीला जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे.

पीडितेच्या कुटुंबाला धमकी...
बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींनी पीडितेच्या काका आणि काकूला परिणामास तयार राहा, अशी धमकी दिली आहे. दुकान जाळून टाकून तुम्हाला जगू देणार नाही, असेही त्यांना धमकाविण्यात आले आहे. पीडितेचे काका हे सीताराम कॉलनीत भाड्याच्या घरात राहतात. छोटेसे दुकान चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.

Web Title: Unnao rape victim who was set ablaze in Unnao and airlifted to Safdarjung Hospital yesterday, died at 11:40 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.