“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 22:06 IST2025-12-06T22:00:03+5:302025-12-06T22:06:02+5:30
Union Minister Naidu Reaction On Indigo Issue: इंडिगो कंपनीच्या विस्कळीत झालेल्या सेवेमुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतल्याचे म्हटले जात आहे.

“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
Union Minister Naidu Reaction On Indigo Issue: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कठोर भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची हजारो उड्डाने रद्द झाली असून, लाखो प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हजारो प्रवाशांना होणारी गैरसोय पाहता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे की, कोणत्याही प्रकारे सरकार तडजोड करणार नाही. हा मुद्दा केवळ तांत्रिक बिघाडांचा नाही, तर जबाबदारी घेण्याचा आहे. याबाबत सरकार अशी कारवाई करेल की, संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक उदाहरण निर्माण करेल, असा इशारा नायडू यांनी दिला.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अशी कठोर कारवाई केली जाईल की, कोणताही विमान वाहतूक कंपनी या मंत्रालयाला हलक्यात घेण्याचा विचारही करू शकणार नाही. आर्थिक आणि दंडात्मक अशा सर्व प्रकारच्या आणि शक्य असलेल्या कारवाया केल्या जातील. या प्रकरणी एक उच्चस्तरीय समिती चौकशी करत आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम पावले उचलली जातील. या सगळ्या गोंधळाची संपूर्ण जबाबदारी इंडिगो कंपनीची आहे. नियम आधीच अस्तित्वात असताना ही समस्या ३ डिसेंबर रोजीच का सुरू झाली, असा प्रश्न मंत्री नायडू यांनी यावेळी उपस्थित केला.
हा प्रकार घडणे खूप आश्चर्यकारक
हा प्रकार घडणे खूप आश्चर्यकारक आहे. इतक्या वर्षांपासून विमान वाहतूक उद्योगातील एक प्रमुख विमान कंपनी आणि गेल्या २० वर्षांपासून सर्वोच्च ऑन-टाइम परफॉर्मन्स देणाऱ्या इंडिगोची अचानक कामगिरी खराब होणे आणि सगळी व्यवस्था विस्कळीत होणे, हे खूप चिंताजनक आहे, असेही नायडू म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. दुसरीकडे, विमान कंपन्यांना रविवार सायंकाळपर्यंत रद्द केलेल्या सर्व उड्डाणांचे तिकिटाच्या रकमेची प्रवाशांना परतफेड करावी. विमान सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांचे सामान पुढील दोन दिवसांत पोहोचवावे, असे नागरी उड्डाण मंत्रालयाने निर्देश दिले आहेत. परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा नियमांचे पालन न केल्यास तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.
दरम्यान, प्रवाशांकडून कोणतेही री-शेड्युल शुल्क आकारले जाणार नाही. इंडिगोला प्रवासी मदत आणि परतावा कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामकाज पूर्णपणे सामान्य होईपर्यंत स्वयंचलित परतावा प्रणाली सुरू राहील. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ज्या प्रवाशांचे सामान उड्डाण रद्द झाल्यामुळे किंवा विलंबामुळे मिळाले नाही, त्यांना ते ४८ तासांच्या आत परत करावे लागेल. इंडिगोने शनिवारी ८०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. तर शुक्रवारी १ हजारहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.