वक्फ सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर करण्यात आले आहे. विधेयकाविरोधात काँग्रेसने मोठा गोंधळ घातला. गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेमध्ये काही वक्फच्या जमिनींचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जमिनींचाही उल्लेख केला.
केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, एक लाख अडतीस हजार एकर जमीन भाड्याने देण्यात आली, खाजगी संस्थांची जमीन शंभर वर्षांच्या भाडेपट्ट्यावर हस्तांतरित करण्यात आली, विजयपूर गावातील १५०० एकर जमीन दावा करून वादात टाकण्यात आली. पंचतारांकित हॉटेल १२००० रुपये भाड्याने देण्यात आले. दरमहा १२००० रुपये दिले आणि सांगितले की हे पैसे गरीब मुस्लिमांचे आहेत. हे श्रीमंतांनी चोरी करण्यासाठी नाही. त्यांचे कंत्राटदार बोलतात, असंही शहा म्हणाले.
महाराष्ट्रातील दोन जमिनींचा उल्लेख केला
यावेळी लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाने दावा केलेल्या दोन जमिनींचा उल्लेख केला. कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे या गावातील एका मंदिराच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे आणि बीड जिल्ह्यातील कंकलेश्वर मंदिराच्या जमिनीवर दावा केला आहे, या दोन्ही जमिनीचा आज शाह यांनी लोकसभेमध्ये संदर्भ दिला.
"कर्नाटकात मंदिरावर दावा केला, ६०० एकर जमिनीवर दावा केला. तसेच ख्रिश्चन समुदायाच्या मालकीच्या बऱ्याच जमिनीवर दावा केला. अनेक गट वक्फ विधेयकाला विरोध करत आहेत. अखिलेशजी, मुस्लिम बांधवांकडून सहानुभूती घेऊन काही फायदा होणार नाही. दक्षिणेकडील हे खासदार जे असे बोलत आहेत ते त्यांच्या क्षेत्रातील सर्व चर्चना संपवत आहेत, असा आरोप शाह यांनी केला.
अमित शाह म्हणाले, तेलंगणामधील १७०० एकर जमिनीवर आणि आसाममधील मोरेगाव जिल्ह्यातील जमिनीवर दावे करण्यात आले. हरयाणातील गुरुद्वाराची जमीन वक्फला सुपूर्द करण्यात आली. प्रयागराजमधील चंद्रशेखर आझाद उद्यानालाही वक्फ घोषित करण्यात आले. हे सर्व चालू आहे, वक्फ हा मुस्लिम बांधवांच्या देणग्यांमधून तयार केलेला ट्रस्ट आहे, सरकार त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. लाखो कोटी रुपयांची जमीन आणि १२६ कोटी रुपयांचे उत्पन्न. हे आपल्याला उत्पन्नाचा उद्देश काय आहे ते सांगतात, असंही शाह म्हणाले.