Amit Shah on Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती आणि उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जगदीप धनखड यांनी दिलेल्या अचानक राजीनाम्याने सर्वांनाच धक्का बसला. राजीनाम्यानंतर जगदीप धनखड हे समोर आलेले नाहीत. त्यामुळे या राजीनाम्याचे कारण दुसरे काहीतरी असू शकते असा आरोप विरोधकांचा आहे. या सर्व गोंधळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. जगदीप धनखड यांनी त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा दिल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून जगदीप धनखड यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? याच प्रश्नाची जोरदार चर्चा सुरुय. त्यामुळे आता माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अमित शाह यांनीही जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे कारण आरोग्याची समस्या असल्याचे सांगितले. जगदीप धनखड यांनी केवळ आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. या प्रकरणावरून कोणीही राजकारण करू नये, असं अमित शाह यांनी म्हटलं.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी यावर भाष्य केलं. "जगदीप धनखड हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संविधानानुसार चांगले काम केले. त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. कोणीही जास्त ताणून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू नये," असं अमित शाह यांनी म्हटलं.
२१ जुलै २०२५ रोजी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. २१ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाले. त्यांनी दिवसभर संसदेच्या कामकाजात अध्यक्ष म्हणून भाग घेतला. मात्र संध्याकाळी परिस्थिती बदलली. त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा सादर केला. राजीनाम्यात त्यांनी आरोग्यविषयक कारणे आणि वैद्यकीय सल्ल्याचा उल्लेख केला होता. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय खळबळ उडाली होती. काँग्रेससह विरोधी पक्षांनी तो सामान्य राजीनामा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.