मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, "बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 08:38 IST2024-12-15T08:34:02+5:302024-12-15T08:38:51+5:30

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार हा जातीय संघर्ष असून त्याचा दहशतवाद किंवा धर्माशी संबंध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Union Home Minister Amit Shah described the ongoing violence in Manipur as an ethnic conflict | मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, "बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे..."

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, "बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे..."

HM Amit Shah on Manipur Voilence : मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या घटना सुरुच असून आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न देखील केला जात आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना मणिपूरमध्ये हिंसाचार न थांबवण्याचे कारण सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मणिपूरमधील वांशिक हिंसाचारामागील अडचणींवर भाष्य केलं आहे.

मणिपूरमध्ये गेल्या १९ महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून आणि हा हिंसाचार कधी संपणार याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती नाही. अशातच शनिवारी ककचिंग जिल्ह्यात दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर येथील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. मणिपूरमधल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ३ मे २०२३ पासून या ईशान्येकडील राज्यात हिंसाचार सुरू आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी या हिंसाचाराबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये मणिपूरमधील परिस्थिती कधी सुधारेल याबाबत अमित शाह यांनी भाष्य केलं. "मी हे निमित्त म्हणून सांगत नाही, तर पार्श्वभूमीबद्दल बोलत ​​आहे. मणिपूरमध्ये जेव्हा-जेव्हा वांशिक हिंसाचार झाला, तेव्हा तो दीड वर्ष चालू राहिला. अनेक वेळा हिंसाचार तीन वर्षांपर्यंत चालला असून त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. जातीय हिंसाचारामुळे हे घडले. मात्र, आता हिंसाचार बऱ्यापैकी कमी झाला आहे, त्यामुळे या लोकांनाही संसदेत गदारोळ करून भडकावायचा आहे. पण मला विश्वास आहे की आता परिस्थिती ठीक होईल," असं अमित शाह म्हणाले.

दरम्यान, मणिपूर दीड वर्षांहून अधिक काळ धुमसत आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या संघर्षात ३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. इम्फाळ खोऱ्यात राहणारा मेईतेई समाज आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागात राहणारा कुकी समाज यांच्यात हा तणाव आहे. बहुसंख्य मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात गेल्या वर्षी एकता मोर्चा काढल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार आजही कायम आहे.
 

Web Title: Union Home Minister Amit Shah described the ongoing violence in Manipur as an ethnic conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.