"भाषणाच्या अखेरपर्यंत थकून गेल्या"; सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:41 IST2025-01-31T14:29:38+5:302025-01-31T14:41:49+5:30
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

"भाषणाच्या अखेरपर्यंत थकून गेल्या"; सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख
Union Budget 2025: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणादरम्यान सरकारच्या योजनांची रूपरेषा सांगितली. मात्र आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर टिप्पणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संसदेच्या संकुलात पत्रकारांनी सोनिया गांधी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचा बिचाऱ्या महिला राष्ट्रपती असं म्हटलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींनी या भाषणाला कंटाळवाणे म्हटलं तर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती भाषण करुन थकल्या असं म्हटलं. सोनिया गांधी यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. सोनिया गांधी यांनी सर्वोच्च पदावर बसलेल्या आदिवासी महिलेचा अपमान केल्याचे केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, शेवटी बोलू शकत नव्हत्या. बिचाऱ्या महिला राष्ट्रपती," असं सोनिया गांधी म्हणाल्या. दुसरीकडे, राहुल गांधी यांनीही राष्ट्रपतींच्या भाषणावर प्रतिक्रिया देत ते कंटाळवाणे असल्याचे म्हटलं. राष्ट्रपतींचे भाषण अत्यंत कंटाळवाणे होते आणि त्यात नवीन काहीच नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
"सोनिया गांधी यांचे वक्तव्य म्हणजे सर्वोच्च पदावर असलेल्या आदिवासी महिलेचा अपमान आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा होता. सरकारच्या मागील अर्थसंकल्प आणि कृती योजनांचा समाजातील प्रत्येक घटकाला फायदा झाला आहे," असं केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल म्हणाले.
"सोनिया गांधी यांनी अभिभाषणाबाबत केलेले विधान योग्य नाही. राष्ट्रपतींनी आपले मत निर्भीडपणे मांडले आहे. सोनिया गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी," अशी मागणी भाजप खासदार संबित पात्रा यांनी केली आहे.