बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:02 IST2025-04-07T16:01:57+5:302025-04-07T16:02:26+5:30
Rahul Gandhi in Bihar: 'भारतीय राज्यघटना हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे.'

बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi in Bihar: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे 'स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या' मोर्चात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बेरोजगारी, महागाई, शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांना जागरुक केले. याशिवाय त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली.
सत्याचा मार्ग अवलंबावा
राहुल गांधी म्हणाले की, अलीकडेच मी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला होता. तिथे मला विचारण्यात आले की, माझे आजोबा पंडित नेहरू नेमके कोण होते, पंतप्रधान, नेते की स्वातंत्र्यसैनिक? यावर राहुल यांनी उत्तर दिले की, जेव्हा मी याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवते की, माझे आजोबा आणि महात्मा गांधी या दोघांचाही सत्याशी खोलवर संबंध आहे. आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्ध, गुरु नानक, कबीर आणि नारायण गुरूंमध्येही हीच विचारधारा दिसून येते. प्रत्येकाने सत्य आणि न्यायाचा मार्ग अवलंबला पाहिजे.
LIVE: Samvidhan Suraksha Sammelan | Patna, Bihar https://t.co/8UylcpPeWu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 7, 2025
राहुल गांधी पुढे म्हणतात, भारतीय संविधान ही नवीन गोष्ट नाही, तर ती हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे. आंबेडकर, फुले, नेहरू यांसारख्या महापुरुषांची विचारसरणी राज्यघटनेत दिसून येते. सावरकरांच्या विचाराचा यात समावेश नाही, कारण ते सत्याच्या मार्गावर चालू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आर्थिक असमानता...
अमेरिकन शेअर बाजाराचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले की, तिथून कोट्यवधींचा नफा झाला, पण त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाला नाही. भारतातही तीच परिस्थिती आहे. काही निवडक लोकांनाच आर्थिक फायदा होतो. त्यांनी दोन उदाहरणे दिली: एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक आयआयटी प्राध्यापक. त्यांनी सांगितले की, दोघांमध्येही क्षमता आहे, पण जर ते मागासवर्गीय (OBC/EBC) मधून आले असतील, तर व्यवस्था त्यांना पुढे जाऊ देत नाही.
LIVE: पलायन रोको, नौकरी दो यात्रा | बेगूसराय, बिहारhttps://t.co/yP6yqUp14L
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 7, 2025
त्यांना बँकेचे कर्ज मिळू शकत नाही, रुग्णालये उघडता येत नाहीत आणि सरकारी नोकरशाही त्यांचा मार्ग अडवते. तेलंगणामध्ये आमच्या सरकारने जात जनगणना केली, ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की, सरकारी बँकांकडून कर्ज घेणारे लोक ईबीसी, ओबीसी किंवा दलित समुदायाचे नाहीत. या बँकांचे मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापनातही या वर्गांचे प्रतिनिधित्व नाही. जवळजवळ शून्य आहे.