अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:38 IST2025-11-24T14:37:57+5:302025-11-24T14:38:54+5:30
फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाजवळ जमिनीखाली बांधण्यात आलेला एक संशयास्पद मदरसा पोलिसांच्या रडारवर आला आहे.

अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाच्या तपासात सुरक्षा यंत्रणांच्या हाती मोठा आणि धक्कादायक सुगावा लागला आहे. फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाजवळ जमिनीखाली बांधण्यात आलेला एक संशयास्पद मदरसा पोलिसांच्या रडारवर आला आहे. या मदरशाची असामान्य रचना, गुप्त स्थान आणि ५ फूट जाडीच्या भिंती यामुळे सुरक्षा यंत्रणांनी याची गंभीर दखल घेतली आहे. दिल्लीस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मुजम्मिल याचे या मदरशाशी काय कनेक्शन आहे, या दृष्टीने तपास सुरू झाला आहे.
जमिनीखाली बंकर स्टाईल बांधकाम
शेतजमिनीखाली सापडलेला हा निर्माणाधीन मदरसा अनेक दृष्टीने अत्यंत संशयास्पद वाटत आहे. हा मदरसा मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर आत, शेताच्या मध्यभागी उभारले जात होता. इमारतीचा मोठा भाग जमिनीखाली खोदण्यात आला आहे, तर केवळ तीन फूट उंचीचा भाग जमिनीच्या वर दिसत आहे. या मदरशाच्या भिंतींची जाडी तब्बल चार ते पाच फूट आहे. सामान्यतः शाळा किंवा इमारतींच्या भिंतींची जाडी ९ इंच असते.
एखाद्या शैक्षणिक संस्थेसाठी एवढी मजबूत आणि जड रचना असणे अत्यंत अनाकलनीय असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे. ही रचना स्फोटक किंवा इतर साहित्याचा साठा करण्यासाठी बंकरसारखी बनवली गेली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे.
मुजम्मिल आणि मौलवी इश्तेयाक यांच्यावर संशय
या मदरशाच्या बांधकामाची देखरेख करणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून दिल्ली स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेला आरोपी मुजम्मिल असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुजम्मिलच्या खोलीतून तपास यंत्रणांना यापूर्वी २९०० किलोग्राम स्फोटके सापडली होती. या इमारतीची नोंदणी मौलवी इश्तेयाक यांच्या नावावर आहे. याच मौलवीने आरोपी मुजम्मिलला भाड्याने खोली दिली होती. पोलिसांनी मौलवी इश्तेयाक याचीही कसून चौकशी सुरू केली आहे.
दहशतवादी फंडिंगचा तपास सुरू
सुरक्षा यंत्रणांनी या बांधकामाची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे. इतक्या मोठ्या आणि असामान्य बांधकामासाठी येणारा खर्च दहशतवादी संघटनांकडून तर पुरवला गेला नाही ना, याचा तपास सुरू आहे.
जमिनीखालील या विचित्र रचनेमागे नेमका काय उद्देश होता? येथे दहशतवादी कारवायांची योजना आखली जात होती का? किंवा मोठ्या प्रमाणात स्फोटके साठवण्यासाठी हा 'गुप्त तळ' उभारला गेला होता का? अशा सर्व शक्यतांचा तपास सध्या सुरक्षा यंत्रणा करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात असून, या प्रकरणातील प्रत्येक धागादोरा तपासला जात आहे.