आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:49 IST2025-10-05T14:49:22+5:302025-10-05T14:49:53+5:30
मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.

आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
आधार कार्डसंदर्भात एक मोठी बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने 7-17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाली असून, ती एक वर्षासाठी उपलब्ध असेल. यामुळे सुमारे 6 कोटी मुलांना फायदा होईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.
कोणत्या वयात होते बायोमेट्रिक? -
पाच वर्षांखालील मुलांची आधार नोंदणी त्यांचे छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्म प्रमाणपत्राद्वारे होते. या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, कारण ते पूर्णपणे विकसित झालेले नसतात. यामुळे, विद्यमान नियमांनुसार, मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आधारमध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन आणि छायाचित्र अपडेट अनिवार्य आहे. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU-1) म्हटले जाते.
15 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक -
तसेच, 15 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे, ज्याला दुसरा MBU म्हणतात. 5-7 आणि 15-17 वर्षे वयोगटात केलेले हे अपडेट आता मोफत असतील. यापूर्वी, या वयोगटाबाहेर प्रत्येक MBU साठी 125 रुपये शुल्क आकारले जात होते. नव्या निर्णयामुळे 5 ते 17 वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत झाले आहे.