Uddhav Thackeray does not have present at NDA dinner | NDAच्या डिनरला उद्धव ठाकरे नाहीत; चर्चेला उधाण, पण खरं कारण वेगळंच!
NDAच्या डिनरला उद्धव ठाकरे नाहीत; चर्चेला उधाण, पण खरं कारण वेगळंच!

मुंबई - एक्झिट पोलच्या अंदाजांनी एनडीएच्या बाजूने कौल दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपा आणि मित्रपक्षांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे  निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमागे खरे कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे. 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह परदेश दौऱ्यावर गेले होते. ते आज मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे ते अमित शहा यांनी आज बोलावलेल्या भाजपाच्या मित्रपक्षांच्या बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामागे कुठलीही नाराजी नाही. सध्या शिवसेनेचे काही नेते आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहेत, तरीही काही नेते पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले. 


 
एनडीएची बैठक आणि नंतर होणाऱ्या डिनरला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याचे वृत्त आल्याने तसेच तसेच या बैठकीला उपस्थित राहण्याबाबतची सूचनाही शिवसेनेच्या अन्य नेत्यांना देण्यात आलेली नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र शिवसेनेतील सूत्रांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  

एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता. यावेळीही भाजपाचे बहुमत हुकल्यास सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीनंतर डीनर पार्टी होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.  ही बैठक संध्याकाळी ७ वाजता अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. यावेळी सर्वांना डीनर देण्यात येणार असून बैठकीला २९ नेत्यांना बोलविण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पीएम मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत. 
 


Web Title: Uddhav Thackeray does not have present at NDA dinner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.