कोकणचे सुपुत्र न्या. उदय उमेश लळीत ४९ वे सरन्यायाधीश; २७ ऑगस्टला शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 06:51 IST2022-08-11T06:51:26+5:302022-08-11T06:51:45+5:30
विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होतील.

कोकणचे सुपुत्र न्या. उदय उमेश लळीत ४९ वे सरन्यायाधीश; २७ ऑगस्टला शपथविधी
नवी दिल्ली : न्या. उदय उमेश लळीत यांची बुधवारी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नेमणूक पत्रावर स्वाक्षरी केली असून, त्यासंबंधीची अधिसूचना विधी मंत्रालयाने जारी केली आहे.
विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होतील. २७ ऑगस्ट रोजी न्या. लळीत पदभार स्वीकारतील. राष्ट्रपती मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. त्यांचा कार्यकाळ अवघा ७४ दिवसांचा असेल. १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील.
कोकणचे सुपुत्र !
न्या. उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.