‘UBER FOR TRACTORS’: Govt launched multilingual 'CHC Farm Machinery' Mobile App for farmers | शेतकरी आता ओला-उबर सारखं मागवणार ट्रॅक्टर, मोदी सरकारचं नवं अ‍ॅप

शेतकरी आता ओला-उबर सारखं मागवणार ट्रॅक्टर, मोदी सरकारचं नवं अ‍ॅप

ठळक मुद्दे'CHC Farm Machinery' असे अ‍ॅप लाँचकृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे मिळणारदेशातील 12 विविध भाषेत अ‍ॅप उपलब्ध

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ आता अधिकच गडद होताना दिसत आहे. याचाच सर्वाधिक जास्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीसाठी अजब कारण सांगितले आहे. 

ओला, उबरसारख्या टॅक्सी सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद हा कारच्या विक्रीवर प्रभाव पाडत आहे. लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-6 मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. यातच आता कृषी मंत्रालयाने खास शेतकऱ्यांसाठी एक अ‍ॅप लाँच केले आहे. ओला आणि उबर सारखे या अ‍ॅपद्वारे शेतकरी ट्रॅक्टरसह अन्य शेतीशी निगडीत उपकरणांची मागणी करु शकतात. यासाठी शेतकऱ्यांना भाडे द्यावे लागणार आहे.  

कृषी मंत्रालयाने  'CHC Farm Machinery' असे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपवर शेतकऱ्यांना कस्टम हायरिंग सेंटर्सच्या माध्यमातून शेतीला लागणारे साहित्य पुरविले जाणार आहे. यासाठी देशभरात 35 हजार कस्टम हायरिंग सेंटर्स तयार करण्यात आले असून वर्षाला 2.5 लाख कृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे भाड्याने देण्याची क्षमता आहे.

'CHC Farm Machinery' अ‍ॅप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येणार आहे. हे अ‍ॅप इंग्रजी, हिंदी, उर्दू, नेपाळी, कन्नड, मराठी, बंगालीसह 12 विविध भाषेत उपलब्ध आहे. तसेच, अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला भाषा निवडावी लागणार आहे. त्यानंतर CHC/सर्व्हिस प्रोव्हायडर आणि शेतकरी/वापरकर्ता अशा दोन कॅटगरी दिसतील. यातील शेतकरी/वापरकर्ता कॅटगरी निवडून नोंदणी करावी लागेल. 

(ऑटो क्षेत्रात एक वर्षांपासून मंदी; जीएसटी कमी करा, इंडस्ट्रीची मागणी)

नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह इतर माहिती द्यावी लागेल. यानंतरच्या स्टेपमध्ये डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डमध्ये 'कृषी यंत्र की बुकिंग'सह सात वेगवेगळ्या कॅटगरी आहेत. 'कृषी यंत्र की बुकिंग'ची कॅटगरी निवड केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर आपल्याला आवश्यक ती कृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे निवड करावी लागेल. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रेलर, हॅप्पी सीड, थ्रेसरसह 25 हून अधिक उपकरणे मिळतील. 

Web Title: ‘UBER FOR TRACTORS’: Govt launched multilingual 'CHC Farm Machinery' Mobile App for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.