भरमसाट दंडापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वाराची 'भन्नाट डोक्यालिटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 22:00 IST2019-09-10T21:56:21+5:302019-09-10T22:00:58+5:30
मी कुठेही जाण्यापूर्वी किंवा दुचाकीवर बसण्यापूर्वी हेल्मेट परिधान करतो

भरमसाट दंडापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वाराची 'भन्नाट डोक्यालिटी'
अहमदाबाद - गुजरातच्या वडोदरा येथील एका नागरिक प्रवाशाने ट्रॅफिक पोलिसांपासून आणि दंडाच्या रकमेपासून वाचण्याचा चांगला उपाय केला आहे. राम शहा असे या व्यक्तीचे नाव असून नवीन ट्रॅफिक नियमांनुसार लावण्यात येणाऱ्या दंडाची भरपाई करण्याची वेळ येऊ नये म्हणून, चक्क आपल्या हेल्मेटलाच ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे चिकटवली आहेत.
मी कुठेही जाण्यापूर्वी किंवा दुचाकीवर बसण्यापूर्वी हेल्मेट परिधान करतो. त्यामुळे, मी हेल्मेटवरच सर्व कागदपत्रे चिकटवली आहेत. कारण, नवीन ट्रॅफिक नियमानुसार दंडाची कारवाई होऊ नये, असे मला वाटत असल्याचे शहा यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे राम शहांना या अवतारात पाहिल्यानंतर ट्रॅफिक पोलीसही त्यांना न अडवता पुढे जाऊ देतात. शहा यांची ही भन्नाट आयडिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर राम शहांचा हेल्मेट परिधान केलेला फोटोही व्हायरल होत आहे.
दरम्यान, दुसरीकडे हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांकडून 500 रुपयांचा दंड वसुल करुन, पोलिसांकडून त्यांस एक हेल्मेट भेट देण्यात येत आहे. तर, नियमांचे पालन करुन वाहन चालविणाऱ्या सजग नागरिकांस थँक यू कार्ड भेट देण्यात येत आहे.
नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे.