क्या बात है... चिमुकल्यांनी लॉकडाऊन काळात लिहीले कॉमिक बुक, ऑनलाईन विक्रीही केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 15:54 IST2020-06-01T15:53:54+5:302020-06-01T15:54:25+5:30
सध्या देशभरात या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे.इशान आठवीत शिकतो आणि योहान सहावीत आहे. त्यांचे दोन्ही पालक व्यवसायाने डॉक्टर आहेत.

क्या बात है... चिमुकल्यांनी लॉकडाऊन काळात लिहीले कॉमिक बुक, ऑनलाईन विक्रीही केली
लॉकडाऊन दरम्यान, तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील दोन भावांनी घरात बंदिस्त असताना वेळेचा सुदपयोग केला आहे. मिळालेला वेळ त्यांनी वाया न घालवता संपूर्ण कॉमिक बुकच लिहून काढले आहे. एवढेच नाही तर व्हॉट्सअॅपवरुन या कॉमिक बुकची विक्रीदेखील करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या कॉमिक बुकमध्ये लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, कोरोना व्हायरसविषयी ज्या प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तेदेखील या बुकमध्ये मांडण्यात आले आहे. पहिल्या आवृत्तीमध्ये, कोरोना व्हायरस लॉकडाउनवर तयार केलेले मिम्स आणि विनोद समाविष्ट केले गेले आहेत. जेणेकरून वाचकास अधिकाधिक रंजक वाटेल
या बुकची पहिली आवृत्ती "द स्टिक्स कॉमिक्स" असे नाव आहे. ज्याप्रमाणे आवडत्या कार्टुनचा वापर करत माहिती वाचण्याचे मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध आहेत. अगदी तशाच प्रकारे हे कॉमिक बुक बनवण्यात आले आहेत. तसेच जगाला कशा रितीने कोरोना सारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागले हा विषय अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे लहानमुलांसाठी लहानग्यांनीच बनवलेले हे पुस्तकं नक्कीच फायदेशीर ठरतील हे मात्र नक्की.
सध्या देशभरात या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे. एकाचे नाव आहे ईशान बेंजामिन पीचमुथु (वय 13) आणि योहान बेंजामिन पिचमुथु (वय 10). इशान आठवीत शिकतो आणि योहान सहावीत आहे. त्यांचे दोन्ही पालक व्यवसायाने डॉक्टर आहेत. यांत मोठा भाऊ कॉमिक बनवण्यावर भर देतो. तर त्याच वेळी, छोटा भाऊ व्हॉट्सअॅपवर त्याचे मार्केटींगचे काम पाहतो. जर लोकांना हे आवडत असेल तर येत्या काळात आम्ही त्याची आणखी एक आवृत्ती आणू असे या दोन्ही चिमुकल्यांचा मानस आहे.
सध्या एका पुस्तकाची किंमत ५० रूपये इतकी असून यावर ५ टक्के इतकी सुटही दिली जात आहे. सुरुवातीला, या कॉमिकच्या 10 प्रती नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटण्यात आल्या होत्या. त्यांनी दिलेल्या पसंतीनंतर या पुस्तकांची ऑनलाइन विक्री सुरू करण्यात आली.