मंदिरात टेंट लावताना दोघांना विजेचा तीव्र धक्का, सीपीआरने वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:15 IST2025-11-07T15:14:19+5:302025-11-07T15:15:36+5:30
स्थानिकांनी वेळीच तत्परता दाखवली.

मंदिरात टेंट लावताना दोघांना विजेचा तीव्र धक्का, सीपीआरने वाचवला जीव
चूरू : राजस्थान चूरू जिल्ह्यातील नयाबास परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आला आहे. बालाजी मंदिरात टेंट लावताना दोन जणांना अचानक इलेक्ट्रिक शॉक लागला आणि दोघेही क्षणात बेशुद्ध पडले. मात्र, सुदैवाने आसपासच्या लोकांची मदती आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे दोघांचे प्राण वाचले.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात कार्यक्रमासाठी टेंट लावण्याचे काम सुरू होते. यावेळी नरेंद्र सैनी यांचे भाऊ ताराचंद सैनी (वय 45) यांना विजेचा जोरदार धक्का बसला. करंट लागताच ते जमिनीवर पडले आणि त्यांच्यासोबत काम करणारा मजूर शिडीवर लटकला. दोघांनाही तत्काळ स्थानिकांनी डीबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे डॉक्टरांच्या टीमने अथक प्रयत्नानंतर त्यांचा जीव वाचवला.
सीपीआर अन् डीसी शॉकने हृदय सुरू झाले
रुग्णालयात दाखल होताना ताराचंद सैनी यांचे हृदय पूर्णपणे बंद पडले होते, ईसीजी सरळ रेषा दाखवत होती आणि ब्लड प्रेशर, तसेच ऑक्सिजन पातळी शून्य होती. अशा गंभीर अवस्थेत मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. पुकार यांनी स्वतः टीमसह काम हाती घेतले. त्यांनी सीपीआर आणि दोन वेळा डीसी शॉक देत हृदय पुन्हा चालू केले.
आयसीयूत दाखल, प्रकृती स्थिर
दोन्ही व्यक्तींना तातडीने मेडिसिन आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, जिथे 24 तासांच्या निरीक्षणानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यात आले असून सध्या ते सामान्य ऑक्सिजनवर स्थिर आहेत. डॉ. पुकार यांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित कमांडो सुरेंद्र कस्वां आणि एसआय रामजीलाल यांनी वेळ न दवडता लगेच सीपीआर देणे सुरू केले, ज्यामुळे ताराचंद सैनी यांचा जीव वाचवणे शक्य झाले.