धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
By संतोष कनमुसे | Updated: November 5, 2025 19:23 IST2025-11-05T19:22:21+5:302025-11-05T19:23:14+5:30
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
आपल्या घरांमध्ये धान्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असते. हे धान्य वर्षभर व्यवस्थित रहावे, त्याला किडे लागू नयेत म्हणून पावडर किंवा सल्फाच्या गोळ्या त्या धान्यामध्ये ठेवतो. पण, या गोळ्या शरीरासाठी धोकादायक तर नाहीत ना? याचा कधी आपण विचारही केलेला नसतो. सध्या मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये अचानक एका कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला आणि आई वडील रुग्णालयात आयसीयुमध्ये आहेत. या घटनेचा पोलिसांनी तपास केला. या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली.
उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून सुरू केलेल्या कूलरने संपूर्ण कुटुंबावर संकट ओढवले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये, गव्हासाठी वापरल्या जाणाऱ्या सल्फास, फॉस्फिन वायूमध्ये रूपांतरित होऊन संपूर्ण कुटुंबाला वेढले. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आणि त्यांचे पालक अजूनही आयसीयूमध्ये जीवनमरणाशी झुंज देत आहेत.
नेमके काय घडले?
पोलिसांनी या घटनेचा तपास केला. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या घरात अंदाजे २५ क्विंटल गहू साठवून ठेवण्यात आले होते. कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी पोत्यांमध्ये सल्फास (अॅल्युमिनियम फॉस्फाइड) गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. आर्द्रता आणि उष्णतेमुळे, या गोळ्या रासायनिकरित्या विरघळल्या आणि फॉस्फिन वायू बाहेर पडला, हा वायू अत्यंत विषारी असतो. कूलरच्या हवेतून जेव्हा हा वायू खोलीत पसरला तेव्हा कुटुंबाला उलट्या, श्वसनक्रिया बंद पडणे आणि बेशुद्ध पडणे यासारखी लक्षणे जाणवू लागली.
अगदी कमी प्रमाणात देखील प्राणघातक ठरू शकतो
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्फाचा सर्वात मोठा धोका म्हणजे त्यावर कोणताही अँटीडोट नसणे. ते शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करते. फुफ्फुसे, हृदय आणि मेंदू हे सर्वात आधी निकामी होतात. अगदी कमी प्रमाणात देखील एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी पुरेसे असते.
फॉरेन्सिक तज्ञांचा इशारा
फॉरेन्सिक तज्ञ डॉ. लोकेश चुघ यांनी याबाबत इशारा दिला. गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये लोक अजूनही गहू किंवा तांदळात सल्फा घालतात. ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे. सल्फास हवेतील आर्द्रतेशी प्रतिक्रिया देते आणि फॉस्फिन वायू सोडते. हा वायू अदृश्य असतो, परंतु तो काही मिनिटांत फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन एक्सचेंज सिस्टमला ब्लॉक करतो.