पैसे वाचवण्यासाठी त्या दोघांनी लढवली शक्कल, एअर इंडियाची झाली पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:09 IST2019-03-27T15:08:13+5:302019-03-27T15:09:27+5:30
दिवसेंदिवस विमान प्रवास महाग होत चालल्याने मुंबईतील दोन प्रवाशांनी अशी काही शक्कल लढवली ती एअर इंडियाच्या प्रशासनाला महागात पडली.

पैसे वाचवण्यासाठी त्या दोघांनी लढवली शक्कल, एअर इंडियाची झाली पळापळ
जोधपूर - दिवसेंदिवस विमान प्रवास महाग होत चालल्याने मुंबईतील दोन प्रवाशांनी अशी काही शक्कल लढवली ती एअर इंडियाच्या प्रशासनाला महागात पडली. या दोन प्रवाशांना जोधपूर या ठिकाणी जायचं होतं मात्र मुंबई ते जोधपूर हा विमान खर्च परवडत नसल्याने त्यांनी मुंबई ते जयपूर या विमानाचे स्वस्त तिकीट घेतले. नियोजित वेळेनुसार मुंबई ते जयपूर या विमानाने उड्डाण घेतले. एअर इंडियाचे हे विमान जोधपूरमार्गे जयपूरला जाणार होतं.
काही वेळानंतर विमान जोधपूर रनवे उतरण्यात आलं. जोधपूरपर्यंत जाणारे सर्व प्रवाशी विमानातून खाली उतरत होते. या प्रवाशांच्या रांगेमधून हळूच कोणालाही न कळता ते दोन प्रवाशी जोधपूर एअरपोर्टला उतरुन निघून गेले. मात्र काही क्षणात हे विमान जयपूरसाठी रवाना होणार होते. तेव्हा विमानातील जयपूरला जाणारे 2 प्रवाशी गायब झाल्याने विमानामध्ये खळबळ माजली. यानंतर चौकशी करुन त्या दोन प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला.
एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन करुन पुन्हा येण्यासाठी विनंती केली. मात्र नातेवाईक आजारी असल्याचे कारण देत त्या प्रवाशांनी पुन्हा विमानात येण्यास नकार दिला. मात्र या दोन प्रवाशांच्या कारनाम्यामुळे तब्बल 45 मिनिटे एअर इंडियाचे विमान जोधपूर रनवेवर उभं होतं. गुरूवारी एअर इंडियाच्या विमानाची मुंबई ते जयपूर तिकीट 10 हजार 30 रुपये होती तर मुंबई ते जोधपूर विमानाचा दर 17 हजार 695 रुपये होता.
नागरी विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाने ज्या ठिकाणापर्यंतची तिकीट घेतली आहे त्याला तिथेपर्यंतचा प्रवास करणे बंधनकारक असतो. या प्रवासादरम्यान जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या प्रवाशाला मध्ये उतरण्याची परवानगी दिली जाते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मध्येच सोडण्याची परवानगी कोणत्याही प्रवाशाला दिली जात नाही. आपत्कालीन परिस्थितीत अंतिम ठिकाणापर्यंत पोहचण्याआधी जवळच्या विमानतळावर लॅंडिग केलं जातं. आणि त्या प्रवाशाला उतरण्याची परवानगी दिली जाते.
6 ऑगस्ट 2017 रोजी दिल्लीहून जयपूर व्हाया जोधपूर जाणाऱ्या विमानात नेव्हीच्या एका अधिकाऱ्याने जोधपूरला उतरण्याची विनंती केली होती. मात्र एव्हिएशन कंपनीने त्यांना परवानगी नाकारली होती.