मुख्यमंत्र्यांच्या कुत्र्याचा मृत्यू; दोन डॉक्टरांना ५ वर्षांचा तुरुंगवास घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 16:09 IST2019-09-16T16:06:33+5:302019-09-16T16:09:38+5:30
दोन डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल

मुख्यमंत्र्यांच्या कुत्र्याचा मृत्यू; दोन डॉक्टरांना ५ वर्षांचा तुरुंगवास घडणार?
हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कुत्र्याचा आजारामुळे मृत्यू झाला आहे. हस्की जातीच्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बंजारा हिल्स पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास डॉक्टरांना ५ वर्षांचा तुरुंगवास घडू शकतो.
चंद्रशेखर राव यांच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी अॅनिमल केअर क्लिनिकच्या डॉक्टर लक्ष्मी आणि डॉक्टर रणजीत यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९ आणि ११ च्या अंतर्गत एफआयएर दाखल केला. ११ महिन्यांच्या हस्कीची प्रकृती बुधवार संध्याकाळपर्यंत उत्तम होती. मात्र त्यानंतर तो अचानक आजारी पडला. यानंतर राव यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी याबद्दलची माहिती डॉक्टर रणजीत यांना दिली.
हस्कीला १०८ डिग्री ताप असल्याची माहिती तपासणी केल्यानंतर रणजीत यांना समजली. त्यांनी कुत्र्याला औषध दिलं आणि त्याला अॅनिमल केअर क्लिनिकमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल केलं. क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर हस्कीचा मृत्यू झाला. राव यांच्या निवासस्थानी नऊ पाळीव कुत्रे आहेत. आसिफ अली खान या कुत्र्यांची काळजी घेतात.