काँग्रेसचे दोन आमदार बेपत्ता? शोधाशोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:34 IST2018-05-18T00:34:07+5:302018-05-18T00:34:07+5:30
कर्नाटकात सत्तेचे गणित जुळवण्याचा खेळ रंगलेला असतानाच काँग्रेसचे दोन आमदार हॉटेलमधून बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे दोन आमदार बेपत्ता? शोधाशोध सुरू
बंगळुरू : कर्नाटकात सत्तेचे गणित जुळवण्याचा खेळ रंगलेला असतानाच काँग्रेसचे दोन आमदार हॉटेलमधून बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही आमदार रात्रीपासून हॉटेलवर परतले नसल्याचे आणि काँग्रेस नेते त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाला आपल्या आमदारांची फोडाफोडी करता येऊ नये यासाठी काँग्रेसने बंगळुरू-म्हैसुरू महामार्गावरील येथील इग्लटन रिसॉर्टमधील १२0 शाही खोल्या बुक केल्या आहेत. त्या पक्षाचे तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे आमदारही तिथेच मुक्काम ठोकून आहेत. मात्र बेल्लारीचे काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि मस्की (जिल्हा : रायचूर)चे आमदार प्रताप गौडा-पाटील बुधवारी रात्री तिथे पोहोचले नाहीत. त्या दोघांचे मोबाइलही बंद असल्याने त्यांची शोधाशोध सुरू आहे.
सकाळी येडियुरप्पा व भाजपाला पाठिंबा देणारे कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टीचे एकमेव आमदार आर. शंकर मात्र संध्याकाळी तेथून पळाले आणि पुन्हा काँग्रेस-जनता दलाच्या कॅम्पमध्ये दाखल झाले. आपला येडियुरप्पा यांना अजिबात पाठिंबा नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले.