...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 07:01 IST2020-11-14T01:05:46+5:302020-11-14T07:01:15+5:30
अमित शहा यांच्या ट्विटर खात्यावरील डीपीतल्या छायाचित्रावर कुणीतरी कॉपीराईटचा दावा केल्याने ट्विटरने ही कारवाई केली होती.

...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरील त्यांचे छायाचित्र गुरुवारी रात्री काही वेळासाठी हटविण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ही नकळत झालेली चूक होती अशी सारवासारव आता ट्विटरने केली आहे.
अमित शहा यांच्या ट्विटर खात्यावरील डीपीतल्या छायाचित्रावर कुणीतरी कॉपीराईटचा दावा केल्याने ट्विटरने ही कारवाई केली होती. अमित शहा यांचा डीपी काढून टाकण्यात आल्याची घटना लगेचच समाजमाध्यमांवर पसरल्याने त्याबद्दल जाहीर चर्चाही सुरू झाली. या डीपीच्या जागी क्लिक केले असता फक्त एक काळा चौकोन दिसत होता.
त्यातील मजकुरात असे लिहिले होते की, कॉपीराईटच्या मुद्यामुळे हे छायाचित्र हटविण्यात आले आहे. मात्र, काही वेळेनंतर अमित शहा यांचे डीपीतील छायाचित्र पुन्हा दिसू लागले. शहा यांच्या ट्विटर खात्याला २.३ कोटी फॉलोअर आहेत. ट्विटरसंदर्भात भारतामध्ये गेल्या काही दिवसांत वादग्रस्त प्रकरणे घडत आहेत.