सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 01:10 IST2025-05-17T01:09:47+5:302025-05-17T01:10:52+5:30
Turkey Celebi Aviation: केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबीचा परवाना रद्द केला होता. याविरोधात या कंपनीने हायकोर्टात धाव घेतली आहे.

सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
Turkey Celebi Aviation: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एकामागून एक पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. यानंतर युद्धविराम झाल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या. भारताने यालाही चोख उत्तर दिले. एका बाजूला जगभरातील अनेक देशांनी भारताच्या या कारवाईचे समर्थन केले आहे. तर तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला आहे. यामुळे भारताने याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली. भारताने तुर्कस्तानच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेससोबतचा करार रद्द केला. परंतु, याविरोधात आता या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या तुर्कस्तानच्या सेलेबी कंपनीने भारताने परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले आहे. सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केंद्र सरकारचा हा निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे ३,७९१ नोकऱ्या आणि गुंतवणूकदारांवर परिणाम होणार आहे. याचबरोबर कंपनीला कोणताही सूचना न देता त्यांनी हा निर्णय जारी केल्याचे कंपनीने न्यायालात म्हटले आहे.
या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारी होण्याची शक्यता
भारत सरकारकडून याबाबत प्रतिक्रिया आलेली नसून, या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारी होण्याची शक्यता आहे. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. सेलेबी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, मोपा आणि कन्नूर या नऊ विमानतळांवर भारतीय विमान वाहतुकीच्या ६५ टक्के वाहतुकीचे व्यवस्थापन करत होती. ही कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया म्हणून ग्राउंड हँडलिंग आणि दिल्ली येथे सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया म्हणून कार्गो सेवा प्रदान करत होती.
दरम्यान, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अद्यापही कायम असल्याचे म्हटले जात आहे. अशात पाकिस्तानबाबत तुर्कस्तानने घेतलेल्या भूमिकेनंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबीचा परवाना रद्द केला होता.