देहत्याग करतो म्हणणारे इरकर कुटुंबीय ताब्यात; धार्मिक पुस्तके, साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:10 IST2025-09-08T15:10:10+5:302025-09-08T15:10:41+5:30
तुकाराम इरकर व कुटुंबाला बेळगावच्या शासकीय रुग्णालयात बंदोबस्तात नेण्यात आले

देहत्याग करतो म्हणणारे इरकर कुटुंबीय ताब्यात; धार्मिक पुस्तके, साहित्य जप्त
अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील तुकाराम इरकर व त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस व आरोग्य प्रशासनाने रविवारी सकाळी ९ वाजता ताब्यात घेतले. आरोग्य तपासणीसाठी त्यांना तालुका आरोग्य केंद्रात नेले. तेथून जिल्हा आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. इरकर कुटुंबीयांनी सोमवारी (दि. ८) देहत्यागाचा निर्णय घेतला होता; पण, प्रशासनाने एक दिवस अगोदरच त्यांना ताब्यात घेतले.
गेल्या १५ दिवसांपासून इरकर कुटुंब महाराजांच्या भक्तीमध्ये मग्न होते. वैकुंठवासी होण्यासाठी देहत्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने या वस्तीवर दररोज गर्दी होत आहे. त्यांना निर्णयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सर्वस्तरावरून झाले. पण, ते ठाम राहिल्याचे दिसताच प्रशासनाने अखेर कारवाईची पावले उचलली.
रविवारी सकाळी ७ वाजताच वस्तीला पोलिसांनी घेराव घातला. तालुका प्रशासनाने त्यांच्या आरोग्याची चौकशी करण्याचे निमित्त करून सकाळी ८ वाजता गावापासून दुसरीकडे स्थलांतरित केले. आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी केली. सध्या पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
१६ जणांना यापूर्वीच पाठविले गावी परत
देहत्यागाचा संकल्प केलेल्या अन्य १६ जणांना यापूर्वीच पोलिस खाते व तालुका प्रशासनाने त्यांच्या मूळ गावी परत पाठविले आहे, तर इरकर कुटुंबातील मुलगी माया शिंदे (रा. कुडनूर, ता. जत) यांनाही बोलावून समुपदेशन केले आहे.
धार्मिक पुस्तके, साहित्य जप्त
रविवारी सकाळी ७ वाजता आलेल्या पोलिसांनी इरकर कुटुंबाची समजूत काढून तुकाराम इरकर, पत्नी सावित्री, मुलगा रमेश, सून वैष्णवी, मुलगी माया यांना रुग्णवाहिकेत बंदोबस्तामध्ये बसविले. त्यांची सर्व धार्मिक पुस्तके, साहित्य जप्त केले. आता घर रिकामे असून, घरास कुलूप ठोकले आहे. तुकाराम इरकर यांचे वडील पांडुरंग इरकर यांनी “माझ्या कुटुंबीयांना बरे करून परत घरी पाठवा,” अशी विनंती पोलिसांना केली आहे.