ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:49 IST2025-08-13T15:49:12+5:302025-08-13T15:49:43+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात मोहिम छेडली आहे. अशातच अलास्काला ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भेटणार आहेत. याच काळात भारताचे सैन्य अमेरिकेला जाणार आहे.

ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
एकीकडे भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यावरून अमेरिकेने भारतावर टेरिफ लादले आहे, त्यात आणखी दंडही आकारला जाणार आहे. पाकिस्तानला अमेरिका चुचकारत आहे. हा पाकिस्तान अमेरिकेच्या जमिनीवरून भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देत आहे. अशा या चिघळलेल्या परिस्थितीत भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात मोहिम छेडली आहे. अशातच अलास्काला ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भेटणार आहेत. याच काळात भारताचे सैन्य अमेरिकेला जाणार आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये ठरल्याप्रमाणे गेल्या दोन दशकांपासून युद्ध सराव केला जातो. भारतीय सैन्य अलास्काला याच युद्धसरावात भाग घेण्यासाठी जाणार आहे.
या युद्धसरावाला 'युद्ध अभ्यास'असे नाव देण्यात आले आहे. दोन देशांदरम्यान हा २१ वा युद्धसराव असणार आहे जो १ ते १४ सप्टेंबर या काळात होणार आहे. वार्षिक संयुक्त लष्करी युद्धसराव पहिल्यांदा २००४ मध्ये सुरु करण्यात आला होता. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये गेल्या वर्षी हा युद्ध सराव पार पडला होता. आता भारतीय सैन्य अमेरिकेत जाणार आहे.
अलास्काच्या थंड आणि उंच पर्वतीय भागामध्ये हा युद्ध सराव केला जाणार आहे. एकत्रितपणे दहशतवादी कारवायांविरोधात सराव करण्याचा, प्रशिक्षित करण्याचा यामागे उद्देश आहे. मद्रास रेजिमेंटचे सैनिक या युद्धसरावाला जाणार आहेत. अमेरिकन सैन्य त्यांच्या नवीन शस्त्रास्त्रांचे आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणार आहे. भारताने 'स्ट्रायकर' वाहनाची जमिनीवरील टेस्टिंग केली होती, भारताला पाण्यातूनही चालणारे हे वाहन हवे आहे. त्याची टेस्टिंग यशस्वी झाली तर भारत हे वाहन खरेदी करू शकणार आहे. तर अमेरिकेला भारताने दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे म्हणजेच ऑपरेशन सिंदूरची माहिती हवी आहे. भारताने एकाचवेळी तीन देशांना कसे काय नमविले, हे अमेरिकन सैन्याला जाणून घ्यायचे आहे.