जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 02:49 IST2025-05-13T02:48:00+5:302025-05-13T02:49:57+5:30
वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यावर होणारे ट्रोलिंग अतिशय लाजिरवाणे व सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे आहे.

जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानने १० मे रोजी शस्त्रसंधी केल्यानंतर विघातक प्रवृत्तींनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, त्यांचे कुटुंबीय, विशेषत: त्यांच्या कन्येला ट्रोलिंग केले. त्याबद्दल विविध राजकीय नेते, माजी सनदी अधिकारी, राष्ट्रीय महिला आयोग तीव्र निषेध नोंदविला. तसेच माजी परराष्ट्र सचिव निरुपमा मेनन राव, एआयएआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मिस्री यांना ठाम पाठिंबा दिला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, देशासाठी अहोरात्र काम करणाऱ्या निष्ठावंत अधिकाऱ्यांना समाजविघातक प्रवृत्ती ट्रोलिंग करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करत आहेत. निर्णय घेणे ही एखाद्या अधिकाऱ्याची नव्हे तर सरकारची जबाबदारी असते नाही. काही जण विक्रम मिस्री व त्यांच्या कुटुंबीयांवर गलिच्छ भाषेत टीका करत आहेत. पण त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्याकरिता केंद्रातील भाजप सरकार किंवा कोणत्याही मंत्र्यांने पावले उचलली नाहीत. त्यांच्याविरोधात सोशल मीडियात बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवरही कोणतीच कारवाई अद्याप झालेली नाही.
हे अतिशय लाजिरवाणे व सर्व मर्यादा पार ओलांडणारे
माजी परराष्ट्र सचिव निरुपमा मेनन राव यांनी म्हटले आहे की, वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यावर होणारे ट्रोलिंग अतिशय लाजिरवाणे व सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. त्यांच्या मुलीची माहिती सोशल मीडियावर उघड करणे, त्यांच्या कुटुंबीयांचा अवमान करणे हे अतिशय अयोग्य आहे.
हा विषारी प्रचार थांबवून आपण सर्वांनी या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की, विक्रम मिस्री हे सुसंस्कृत, प्रामाणिक राजनैतिक अधिकारी आहेत.
ते आपल्या देशासाठी अविरत परिश्रम करत आहेत. सनदी अधिकारी हे सरकारच्या आदेशांना बांधील असतात, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांसाठी अधिकाऱ्यांना दोष देणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना ट्रोलिंग करणे अतिशय चुकीचे आहे.
नागरिकांनी संयम बाळगावा : रहाटकर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले की, मिस्री यांच्या कन्येची वैयक्तिक माहिती नेटकऱ्यांनी ऑनलाइन शेअर केल्याचे कृत्य अतिशय बेजबाबदार आहे. त्यामुळे तिची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. वैयक्तिक हल्ले करणे हा चुकीचा प्रकार आहे. ऑनलाइन आणि वास्तवात नागरिकांनी संयम बाळगून व्यक्त होणे आवश्यक आहे.