कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:10 IST2025-11-10T17:07:44+5:302025-11-10T17:10:42+5:30
जम्मू काश्मीर पोलिसांनी २ कुख्यात दहशतवाद्यांना पकडून एक मोठा कट उधळून लावला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे.

कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
जम्मू काश्मीर पोलिसांनी २ कुख्यात दहशतवाद्यांना पकडून एक मोठा कट उधळून लावला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. जम्मू पोलिसांनी घाटीतील संवेदनशील भागांमध्ये फेशियल रिकॉग्निशन सिस्टम लावल्या आहेत. ही सिस्टम कोणत्याही दहशतवादी हालचालींची माहिती रियल टाईममध्येच पोलिसांपर्यंत पोहोचवते. याच सिस्टममुळे दहशतवादी अकील याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दहशतवादी डॉक्टर अकील श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर लावण्यासाठी बाहेर पडला होता. हे पोस्टर लावतानाच तो या फेशियल रिकॉग्निशन सिस्टममध्ये कैद झाला आणि त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी या व्हिडिओचा बारकाईने तपास करताच अकीलचा चेहरा समोर आला, पोलिसांनी मागोवा घेत अकीलला सहारनपुरमधून ताब्यात घेतले.
एके ४७ आणि दारूगोळा केला जप्त
रिपोर्ट्सनुसार, अकीलची चौकशी करताना त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. या महितीतून त्याच्या अनंतनागमधील जीएमसी भागात असलेल्या लॉकरमधून एके ४७ आणि काही दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. याच चौकशीदरम्यान अकीलने पोलिसांना त्याच्या साथीदाराची माहिती दिली. त्याने दिलेल्या महितीच्या आधारावर पोलिसांनी फरीदाबादमधून मुजम्मिल याला अटक केली. मुजम्मिलकडून पोलिसांनी तब्बल ३६० किलो स्फोटके आणि दारूगोळा जप्त केला आहे.
'या' दहशतवादी गटात होते सामील
पोलिसांनी अटक केलेले हे डॉक्टर अंसार गझवतुल हिंद नावाच्या एका दहशतवादी गटाशी जोडलेले आहेत. ही दहशतवादी संघटना २०१७ मध्ये जाकिर मूसा याने सुरू केली होती. जाकिर मूसाने हिजबुलची विचारधारा इस्लाम आणि शरियतच्या विरुद्ध असल्याचे सांगून स्वतःचा वेगळा गट बनवला होता. हा गट म्हणजे अल-कायदाची जम्मू-काश्मीरमधील शाखा आहे. २०१९ मध्ये सुरक्षा दलांनी जाकिर मूसाला मारले, ज्यामुळे या गटाची ताकद खूप कमी झाली.
तिसरा डॉक्टर फरार
जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर अकील यांना अटक केली आहे. डॉक्टर मुजम्मिलला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली. दोघांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या तिघांव्यतिरिक्त तिसरा डॉक्टर अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या तिन्ही डॉक्टरांचे खूप दिवसांपासून दहशतवाद्यांशी संबंध होते, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.