Amreli Plane Crash:गुजरातच्या अमरेलीमध्ये विमान अपघाताची भीषण घटना घडली. मंगळवारी दुपारी अमरेलीतील गिरिया रोडवर एका खाजगी कंपनीचे विमान अचानक कोसळले. विमान कोसळले तेव्हा त्यात वैमानिक होता. वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झाला. एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पायलट प्रशिक्षण केंद्राचे हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे विमानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अमरेली अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.
प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अमरेलीतील एका निवासी भागात कोसळले. विमान एका झाडाला धडकले आणि नंतर एका मोकळ्या जागेवर कोसळले. अज्ञात कारणांमुळे दुपारी १२.३० च्या सुमारास अमरेली शहरातील गिरिया रोड परिसरातील एका निवासी भागात विमान कोसळले, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला. पायलट एकटाच उड्डाण करत होता. या अपघातात इतर कोणीही जखमी झाले नाही. विमान जळून राख झाले, अशी माहिती अमरेलीचे पोलीस अधीक्षक संजय खरात यांनी दिली.
"या घटनेत प्रशिक्षणार्थी पायलट अनिकेत महाजनचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांसह अग्निशमन विभागाने मदतकार्य सुरू केले. अमरेली विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. शास्त्री नगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि ते आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. दिल्लीस्थित एक विमानचालन अकादमी अमरेली विमानतळावरून पायलट प्रशिक्षण देते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे," असे पोलीस अधीक्षक संजय खरात यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी अपघात झाला त्या अमरेलीतील गिरिया रोड परिसरात सहसा गर्दी असते. मात्र तापमान जास्त असल्याने लोकांची गर्दी तिथे नव्हती. त्याचवेळी हा अपघात झाला. जेव्हा अपघात झाला तेव्हा असे वाटले की जणू काही मोठा स्फोट झाला आहे. जेव्हा घराबाहेर पाहिले तेव्हा विमान जळताना दिसले. योगायोगाने विमान ज्या भागात कोसळले त्या भागात रहदारी नव्हती, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगतिले.