विचित्र योगायोग, 'तेजस'मधील गळतीचे दावे सरकारने फेटाळले, दुसऱ्याच दिवशी दुबई विमान कोसळून मोठा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 14:36 IST2025-11-22T14:29:25+5:302025-11-22T14:36:37+5:30
दुबईत तेजस विमान कोसळून स्क्वाड्रन लीडर नमन स्याल यांना वीरमरण आले.

विचित्र योगायोग, 'तेजस'मधील गळतीचे दावे सरकारने फेटाळले, दुसऱ्याच दिवशी दुबई विमान कोसळून मोठा अपघात
Tejas Crashes in Dubai: भारताच्या स्वदेशी बनावटीच्या एलसीएए तेजस Mk1 लढाऊ विमानाचे दुबई एअरशोमध्ये हवाई कसरत करत असताना शुक्रवारी दुपारी अपघात झाला. या दुःखद घटनेत वैमानिक, स्क्वाड्रन लीडर नमन स्याल यांना वीरमरण आले. या अपघातामुळे जागतिक स्तरावर भारतीय संरक्षण सामर्थ्याचे प्रदर्शन करणाऱ्या या महत्त्वपूर्ण एअरशोला मोठी धक्का बसला आहे. मात्र हा अपघाताच्या घटनेशी संबंधित एक विचित्र योगायोग पाहायला मिळत आहे. अपघाताच्या केवळ एक दिवस आधीच, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट-चेक युनिटने सोशल मीडियावर तेजस विमानात तेल गळती होत असल्याच्या खोट्या दाव्यांना पूर्णविराम दिला होता.
कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश
अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर शोच्या अंतिम दिवशी हा अपघात झाला. हवाई कसरत करताना तेजस विमानाची उंची अचानक कमी झाली आणि ते जमिनीवर कोसळले. भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेला दुजोरा दिला असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. हिमाचल प्रदेशच्या कांग्रा येथील स्क्वाड्रन लीडर नमन स्याल यांच्या निधनाबद्दल हवाई दलाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
अफवांना पूर्णविराम, पण दुसऱ्याच दिवशी अपघात
तेजस विमानाचा अपघात होण्याच्या केवळ २४ तास आधी, या स्वदेशी विमानाची विश्वसनीयता कमी करण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियावर सुरू होता. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट-चेक युनिटने या खोट्या दाव्यांवर ठोस स्पष्टीकरण देऊन या अफवांना पूर्णविराम दिला होता. दुबईच्या दमट हवामानात विमानाच्या एअर कंडिशनिंग सिस्टीममधून आणि ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेटिंग सिस्टीममधून बाहेर पडणारे घनरूप पाणी हेच तेल गळती असल्याचा खोटा प्रचार पाकिस्तानी अकाऊंटद्वारे केला जात होता. पीआयबीने हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट करत, 'स्वदेशी विमानाची विश्वसनीयता कमी करण्यासाठी' हा प्रचार हेतुपुरस्सर पसरवला जात असल्याचे म्हटले होते.
Several propaganda accounts are circulating videos claiming that at the #DubaiAirshow 2025, the Indian LCA #Tejas Mk1 suffered an oil leakage.#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 20, 2025
✅These claims are #Fake.
✅The videos show routine, intentional draining of condensed water from the aircraft's… pic.twitter.com/k4oQThqtA3
दरम्यान, तेजस विमान दुबई एअरशोमध्ये भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे सर्वात मोठे आकर्षण होते. तेल गळतीचा दावा खोटा ठरवल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अपघात झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. युद्धावेळची ॲक्रोबॅटिक अत्यंत धोकादायक हवाई कसरत करताना हे विमान कोसळले. अपघाताच्या वेळी 'तेजस' निगेटिव्ह-जी टर्न घेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.