ड्रायव्हरला डुलकी लागली अन्... कार दरीत कोसळल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू, १५० किमीच्या वेगात होती गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:10 IST2025-11-14T14:24:42+5:302025-11-14T15:10:06+5:30
मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात एकाचवेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ड्रायव्हरला डुलकी लागली अन्... कार दरीत कोसळल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू, १५० किमीच्या वेगात होती गाडी
MP Accident: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाल. रतलाम जिल्ह्यातील रावटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमपुरा गावाजवळ माही नदीच्या पुलाजवळ महिंद्रा XUV 700 ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याचे रेलिंग तोडून थेट दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सकाळी सुमारे ७.३० वाजता MH03 EL 1388 या नोंदणी क्रमांकाची कार दिल्लीहून मुंबईकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालवणाऱ्या दुराज (वय ३५) याला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक संदीप पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच्या अगदी १० फूट अंतरावर स्पीड गन लावलेली आहे. या 'स्पीड गन'च्या तपासणीतून असे स्पष्ट झाले आहे की, अपघाताच्या वेळी या कारचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड होता. याच अतिवेगामुळे गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.
अपघातात मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींमध्ये १५ वर्षांचा एक मुलगा आणि ६० वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ यांचा समावेश आहे. मृतांमध्ये चार जण मुंबईचे आणि एक जण गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी आहे. दानिश उस्मान चौधरी (वडोदरा), गुलाम रसूल चौधरी (वय ७०), खालिद गुलाम चौधरी, गुलाम मोइद्दीन चौधरी (वय १५), दुराज (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पाचही जणांचा मृत्यू जागीच झाला असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला असून, त्यांची ओळख पटवण्यासाठी काही नातेवाईक रतलाम येथे येत आहेत.
पुण्यात नवले पुलावर मृत्यूचे तांडव
दरम्यान, गुरुवारी पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकासह क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ९ ते १० जण गंभीररित्या जखमी झाले.