पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:35 IST2025-07-29T14:35:02+5:302025-07-29T14:35:40+5:30
Operation Mahadev: पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. हे दहशतवादी आणखी एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
Operation Mahadev News Marathi: पहलगाममधील बैसरन पठारावर निष्पाप पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने २८ जुलै रोजी खात्मा केला. पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या आणि त्याच्या दोन साथीदार दहशतवादी एका लष्करी चकमकीत मारले गेले. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या तयारीत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. लष्कराच्या ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य करण्याच्या तयारीत होते.
यात्रेकरूंवर हल्ल्याचा होता कट
सूत्रांनी सांगितले की, जे दहशतवादी ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेले, ते त्यांचा पुढील निशाणा अमरनाथ यात्रा होती. अमरनाथ यात्रा सुरू असून, यात्रेदरम्यान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत हे दहशतवादी होते. ऑपरेशन महादेवने दहशतवाद्यांचे पुढील हल्ल्याचे मनसुबे उधळले गेले.
२२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी देशभरातून पहलगाममधील बैसरन पठारावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पुरुषांनाच धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि हत्या केल्या.
या घटनेपासून गुप्तचर यंत्रणा, लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू होती. अखेर या दहशतवाद्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना यश आले. श्रीनगरजवळ असलेल्या हरवनच्या जंगलात दहशतवादी असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली.
दहशतवाद्यांकडून सॅटेलाईट फोनचा वापर केला जात होता. याच फोनचा वापर पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी केला गेला होता. त्यामुळे यंत्रणांनी या फोनवर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर दहशतवादी असल्याची खात्री झाल्यानंतर ऑपरेशन महादेव हाती घेण्यात आले आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.