“ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीचे छापे”; महुआ मोइत्रांचा भाजपला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:35 IST2023-11-20T15:33:54+5:302023-11-20T15:35:06+5:30
TMC Mahua Moitra: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी भाजपवर टीका केली.

“ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीचे छापे”; महुआ मोइत्रांचा भाजपला खोचक टोला
TMC Mahua Moitra: २०२३ चा आयसीसी विश्वचषक उंचावण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर, कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी हजेरी लावली होती. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळून ऑस्ट्रेलियाने नवा इतिहास रचला. यानंतर महुआ मोइत्रा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करताना केंद्र सरकार आणि भाजपला खोचक शब्दांत टोला लगावला. गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्ससह अन्य तपास यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात छापेसत्र सुरू असल्याचे दिसत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. हाच धागा पकडत महुआ मोइत्रांनी टीका केली.
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीची छापेमारी
महुआ मोइत्रा यांनी एक्सवर लिहिले आहे की, अहमदाबादमधील स्टेडियमचे नाव बदलले. जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाला, असे सांगत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये, ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) छापेमारी केली, या शब्दांत खोचक टोला लगावला.
दरम्यान, लोकसभेच्या नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर यांनी तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरील समितीचा अहवाल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात सादर केला आहे. महुआ मोइत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल बहुमताने स्वीकारला. यानंतर महुआ मोइत्रा यांना तृणमूल काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्यात आली.