Mamata Banerjee Replied Amit Shah: “अमित शाहजी, तुमच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, पण...”; ममता दीदींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 19:48 IST2022-05-05T19:47:40+5:302022-05-05T19:48:28+5:30
Mamata Banerjee Replied Amit Shah: भाजपवाले २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येत नाहीत, असा मोठा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Mamata Banerjee Replied Amit Shah: “अमित शाहजी, तुमच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, पण...”; ममता दीदींचा पलटवार
कोलकाता: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. सिलिगुडी येथे एका जनसभेला संबोधित करताना अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली. अमित शाह यांनी केलेल्या टीकेचा ममता दीदींनी चोख शब्दांत समाचार घेतला. एक नागरिक म्हणून अमित शाह यांचा नक्कीच सन्मान करते. परंतु, तुमच्याबद्दल बरेच काही माहिती आहे, असा सूचक इशारा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला.
तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की, नागरिकत्व कायदा कधीही लागू होणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की कोरोना महामारी संपल्यावर आम्ही सुधारित नागरिकत्व कायदा लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.
ते २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येत नाहीत
ही त्यांची योजना आहे, ते संसदेत विधेयक का आणत नाहीत? ते २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येत नाहीत. मला हे सांगायचे आहे. कोणाच्याही नागरिकत्वाच्या अधिकारांना नुकसान पोहोचेल, असे मला वाटत नाही. आमची एकता हीच आमची ताकद आहे. अमित शाह एका वर्षानंतर इथे आले आहेत. ते प्रत्येक वेळी येतात आणि अशा गोष्टी बोलतात, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे.
अमित शाह यांनी आगीशी खेळू नये
अमित शाह यांनी आगीशी खेळ करू नये. गृहमंत्री म्हणून सीबीआयला कारवाई करण्यास भाग पाडले आहे. अमित शाह यांनी देशातील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. त्यांनी मतदान केल्याने ते गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. मुस्लिम बांधव देशाचे नागरिक नाहीत का, अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली. अमित शाह यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांकडेही पाहावे. भाजपवाले समाजात फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याचा मोठा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.