महुआ मोईत्रांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झटका बसणार; सचिवालयाची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 00:01 IST2023-12-01T23:40:50+5:302023-12-02T00:01:12+5:30
पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी महुआ यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस या समितीने स्वीकारली होती.

महुआ मोईत्रांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झटका बसणार; सचिवालयाची तयारी सुरू
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांच्यावर आपला अहवाल तयार केला आहे. तो संसदेत मांडला जाणार आहे. पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी महुआ यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस या समितीने स्वीकारली होती.
लोकसभा सचिवालयाच्या लिस्ट ऑफ बिझनेसनुसार समितीचे अध्यक्ष विनोदकुमार सोनकर हे अहवाल संसदेच्या पटलावर ठेवणार आहेत. ९ नोव्हेंबरला हा अहवाल स्वीकारण्यात आला आहे. समितीने गेल्या महिन्यात 10 नोव्हेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तपास अहवाल पाठवला होता.
या समितीने ओम बिर्ला यांच्या आदेशांनंतरच हा चौकशी अहवाल तयार केला होता. सुमारे ५०० पानांचा हा अहवाल आहे. हा अहवाल 6-4 च्या फरकाने मंजूर करण्यात आला होता. मोइत्रा यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर मानले आहेत आणि तिचे वर्तन आक्षेपार्ह आणि अनैतिक असल्याचे म्हटले आहे. समितीने सखोल चौकशी अहवाल येईपर्यंत महुआचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची किंवा त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्याची शिफारस केली आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होत असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या 19 दिवसांत 15 बैठका होणार आहेत. अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने 2 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.