धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 05:49 IST2025-12-17T05:48:31+5:302025-12-17T05:49:20+5:30
दाट धुक्यात यमुना एक्स्प्रेस-वे गायब झाला होता.. याच धुक्यात जणू 'काळ' वाट पाहात होता... पुढचे काहीच दिसत नसल्याने वेगात येणाऱ्या ७ बस आणि ३ कार एकमेकांवर धडकल्या.

धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
मथुरा : पहाटेचे साडेचार वाजले होते... दाट धुक्यात यमुना एक्स्प्रेस-वे गायब झाला होता.. याच धुक्यात जणू 'काळ' वाट पाहात होता... पुढचे काहीच दिसत नसल्याने वेगात येणाऱ्या ७ बस आणि ३ कार एकमेकांवर धडकल्या. त्यानंतर भीषण आगीचा भडका उडला आणि त्यात १३ जण जळून खाक झाले. ३५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
आग्रा नोएडा मार्गावरील बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १६) पहाटे हा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की अनेक प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. घटनास्थळावरून समोर आलेल्या दृश्यांमध्ये जळून खाक झालेल्या बसेसचे सांगाडे दिसत होते.
मदत जाहीर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये आर्थिक मदत जाहीर केली.
आगीनंतरचे दृश्य भयंकर
अग्निशमन दलाच्या गाड्यांनी अखेर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर तेथील दृश्य भयंकर होते. बसमधून जळालेल्या अवस्थेतील सापळे आणि अर्धवट जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
आग इतकी प्रचंड होती की एक्स्प्रेसवेवरील पांढऱ्या रेषाही पूर्णपणे वितळून नष्ट झाल्या. काही मृतदेह बसच्या सिटांना चिकटलेल्या अवस्थेत आढळले, पोलिसांनी हे मृतदेह बसमधून बाहेर काढून १७ पिशव्यांत ठेवून शवविच्छेदनगृहात पाठवले.
दाट धुक्यामुळे २५ जणांचा मृत्यू : उत्तर
प्रदेशातील पाच जिल्ह्यांत दाट धुक्यामुळे झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातांत २५ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १०९ जण जखमी झाले आहेत.