Till today, our nuclear policy is 'No First Use' Says Defense Minister Rajnath Singh | Video: आता पाकची खैर नाही; अण्वस्त्र वापराबाबत संरक्षण मंत्र्यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले... 
Video: आता पाकची खैर नाही; अण्वस्त्र वापराबाबत संरक्षण मंत्र्यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले... 

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये मोठं विधान केलेले आहे. आजपर्यंत भारताने कधीही अण्वस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर निर्भर आहे असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात त्यांनी विधान केले आहे. 

या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अटल बिहारी वाजपेयींच्या धाडसी निर्णयाची आठवण करुन देताना म्हणाले की, 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्वांमुळे सुलभता आणि सुशासन याला राजकारणात चालना मिळाली. सबका साथ, सबका विश्वास याची प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली. 

गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. 

मात्र काश्मीरमधून कलम 370 हटविण्यावरुन पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढलेला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाला धमकी देणारं ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय की, हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? जिहादच्या नावाखाली पाकिस्तानकडून जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जर जगाने काश्मीर प्रश्नी वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील, त्याचे पडसाद जगातील मुस्लिमांवर होऊन कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराला सुरुवात होईल. त्यामुळे दोन्ही देशातील वाढता तणाव लक्षात घेता संरक्षण मंत्र्यांनी केलेले हे विधान महत्वाचे आहे. 
 

Web Title: Till today, our nuclear policy is 'No First Use' Says Defense Minister Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.