TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:00 IST2025-08-23T13:57:11+5:302025-08-23T14:00:03+5:30
TikTok India Updates: भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष निवळला असून, दोन्ही देशातील संवाद सुरू झाला आहे. त्यातच टिकटॉक पुन्हा सुरू होणार असल्याचे वृत्त धडकले. टिकटॉक भारतात सुरू होणार हे खरंय का?

TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
TikTok Latest news: भारताने बंदी घातलेला लोकप्रिय व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक पुन्हा सुरू होत असल्याचे काही रिपोर्टमध्ये म्हटले गेले. त्यामुळे 'टिकटॉक'च्या घरवापसीच्या चर्चा सुरू झाल्या. पण, केंद्र सरकारने हे रिपोर्ट फेटाळले आहेत. टिकटॉकवरील बंदी हटवण्यासंदर्भात कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एएनआय वृत्तसंस्थेने सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारताने टिकटॉकवरील बंदी हटवल्याचे रिपोर्ट खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. टिकटॉकवरील बंदी हटवण्यासंदर्भात कोणताही आदेश सरकारने काढलेला नाही.
दरम्यान, चिनी ई-कॉमर्स वेबसाईट अलीएक्स्प्रेस आणि कपडे विक्री करणारी शीईन यांची बंदी हटवण्यात आल्याच्या संदर्भात सरकारकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
The Government of India has not issued any unblocking order for TikTok. Any such statement/news is false and misleading: Govt Sources pic.twitter.com/1BxK5jE4xG
— ANI (@ANI) August 22, 2025
टिकटॉकबद्दल अचानक चर्चा का सुरू झाली?
काही यूजर्संना टिकटॉकची वेबसाईट दिसू लागली आहे. पण, ते लॉगिन करू शकत नाहीत. त्याचबरोबर व्हिडीओ अपलोड करू शकत नाही, बघू शकत नाही. मात्र, टिकटॉकचे होमपेज दिसू लागल्याने सरकार बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले.
गलवानमधील संघर्षानंतर टिकटॉकवर बंदी
चीन आणि भारतीय लष्करामध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे काही जवान शहीद झाले होते. त्या संघर्षानंतर भारताने जून २०२० मध्ये ५९ चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, शॉपिंग वेबसाईटवर बंदी घातली होती. यात टिकटॉक, यूसी ब्राऊझर, वुईचॅट हे लोकप्रिय प्लॅटफॉर्मही होते.