विनेशला तिकीट; हरयाणात राजकीय ‘दंगल’, कुस्तीपटू विनेश फोगाटला हरयाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:11 IST2024-09-05T13:10:20+5:302024-09-05T13:11:12+5:30
Haryana Assembly Election 2024: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीमध्ये भेट घेतली. हरयाणा विधानसभा निवडणुकांत एकाच कुस्तीगीराला तिकीट देणे शक्य आहे, असे काँग्रेसने या दोघांना सांगितले.

विनेशला तिकीट; हरयाणात राजकीय ‘दंगल’, कुस्तीपटू विनेश फोगाटला हरयाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार
- आदेश रावल
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीमध्ये भेट घेतली. हरयाणा विधानसभा निवडणुकांत एकाच कुस्तीगीराला तिकीट देणे शक्य आहे, असे काँग्रेसने या दोघांना सांगितले. त्यानुसार विनेश फोगाट यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राहुल गांधी यांच्या भेटीनंतर फोगाट व पुनिया काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनाही भेटले. विनेश फोगाटने दोन मतदारसंघातून मला उमेदवारी द्या, अशी विनंती काँग्रेस नेतृत्वाला केली होती. त्या जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नव्हते. त्यामुळे विनेश फोगाटला तिथे उमेदवारी देण्यात काँग्रेसला फारशी अडचण येणार नाही. हरयाणामध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास बजरंग पुनिया यांना एखादे महत्वाचे पद दिले जाईल, असे आश्वासन त्या पक्षाने दिले आहे.
बजरंग पुनिया यांना संघटनात्मक कामात सक्रिय व्हायचे असेल तर पक्ष तशा स्वरुपाची कामगिरी देखील त्यांच्यावर सोपवू शकतो, असेही त्यांना सांगण्यात आले. बजरंग पुनिया यांना ज्या मतदारसंघातून उमेदवारी हवी तो काँग्रेसचे आमदार कुलदीप वत्स यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथून त्यांना उमेदवारी देणे शक्य नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेसची यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.