पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 05:36 IST2025-07-29T05:32:35+5:302025-07-29T05:36:01+5:30
पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी वापरली तशीच शस्त्रे श्रीनगरनजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती.

पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
श्रीनगर: २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार व त्याच्या दोन साथीदारांचा लष्कराच्या विशेष पॅरा कमांडोंनी सोमवारी एका चकमकीत खात्मा केला. या कारवाईला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरनजीकच्या असलेल्या हरवनच्या जंगल परिसरात ही घटना घडली. गेल्या वर्षी सोनमर्ग बोगदा प्रकल्पावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचाही मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सॅटेलाइट फोनमुळे हल्लेखोरांचा लागला छडा
काश्मीर विभागाचे पोलिस महानिरीक्षक व्ही. के. बर्डी यांनी सांगितले की, हरवनच्या जंगलात लष्करी जवान व दहशतवाद्यांमध्ये काही तास सोमवारी चकमक सुरू होती. या परिसरात सॅटेलाइट फोनचा वापर काही जणांकडून होत असल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांनी त्याठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. हाच फोन पहलगाम हल्ला करताना दहशतवाद्यांनी वापरला. त्या फोनवर ठेवलेल्या पाळतीमुळेच हल्लेखोरांचा गुप्तहेर यंत्रणांना छडा लावता आला.
जिब्रान, हमजा अफगाणी देखील मारले गेले
पहलगाम हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार सुलेमान ऊर्फ आसिफ ठार झाला असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा कयास आहे, तर त्याचे दोन साथीदार जिब्रान व हमजा अफगाणी हेदेखील या चकमकीत मारले गेले आहेत. पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी वापरली तशीच शस्त्रे श्रीनगरनजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. (वृत्तसंस्था)