ज्यांना पक्षात काही जबाबदारीच घ्यायची नाही, त्यांनी निवृत्त व्हावे : खरगे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:26 IST2025-04-10T09:26:18+5:302025-04-10T09:26:35+5:30
आता उमेदवार निवडीत जिल्हा अध्यक्षांच्या शब्दाला महत्त्व.

ज्यांना पक्षात काही जबाबदारीच घ्यायची नाही, त्यांनी निवृत्त व्हावे : खरगे यांचा इशारा
अहमदाबाद : ज्यांनी पक्षकार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही, अशा नेत्यांनी आराम करावा आणि ज्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही, त्यांनी निवृत्तीच स्वीकारावी, असा कडक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या नेत्यांना बुधवारी दिला. काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले. काँग्रेस देशातील ऐक्य कायम ठेवण्यासाठी झटते तर भाजप समाजात फूट पाडत आहे, असेही ते म्हणाले.
येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठकीच्या अखेरच्या दिवशी खरगे म्हणाले की, पक्ष संघटनेत यापुढे जिल्हा अध्यक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्तीत पक्षपात होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणुकीत उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत त्यांच्याच शब्दाला महत्त्व असेल. जिल्हा अध्यक्षांना त्यांची नियुक्ती झाल्यापासून एक वर्षाच्या आत बूथ कमिटी, मंडळ कमिटी, ब्लॉक कमिटी व जिल्हा कमिटीत चांगल्या लोकांना सामावून घेत तयार कराव्या लागतील. या नेमणुकांत कोणताही पक्षपात होऊ नये, ही त्यांची जबाबदारी असेल.
महाराष्ट्रात फसवणुकीने विजय मिळविल्याचा आरोप
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत भाजपने फसवणूक करून विजय मिळविल्याचा आरोप खरगे यांनी यावेळी केला. निवडणुकांत मतपत्रिकेच्या आधारेच मतदान घेतले जावे, अशीही मागणी त्यांनी केली.
संपूर्ण जग ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिकांकडे वळत आहे; पण केंद्र सरकार ईव्हीएमसाठी आग्रही आहे. आपल्याला फायदा होईल, अशा प्रकारचेच तंत्रज्ञान केंद्र सरकारने ईव्हीएमसाठी विकसित केले आहे. केंद्र सरकारने ११ वर्षांपासून सातत्याने राज्यघटनेवर हल्ले केले. त्यामुळे राज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेसने लढा सुरू केला आहे. संसदेत विरोधी पक्षनेत्याचे भाषणासाठी नाव पुकारले जाते; पण त्याला बोलू दिले जात नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हा अध्यक्षांच्या तीन बैठका
देशभरातील जिल्हा अध्यक्षांच्या तीन बैठका घेण्यात आल्या. राहुल गांधी आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. उमेदवार निवडीत त्यांना सामील करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असेही ते म्हणाले.