"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:44 IST2025-12-18T11:42:54+5:302025-12-18T11:44:20+5:30
रशियात शिक्षणासाठी गेलेल्या अजयचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला. अजयचा रशिया युक्रेन युद्धात मृत्यू झाला.

"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
गेल्यावर्षी शिक्षण घेण्यासाठी बिकानेरचा अजय गोदरा रशियात गेला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क तुटला होता. त्याच्या कुटुंबीयांकडून पंतप्रधान कार्यालयाकडेही विनवणी करण्यात आली होती. पण, अजयचा मृतदेहच त्याच्या कुटुंबीयांना मिळाला. आता त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
अजय गोदारा गेल्या वर्षी २८ डिसेंबर २०२४ रोजी शिक्षणासाठी रशियामध्ये गेला होता. रशियात गेल्यानंतर त्याला नोकरी लावून देण्याचे आमिष देण्यात आले होते. त्याबदल्यात त्याला पैसे देण्याचेही कबूल करण्यात आले होते.
नोकरीच्या नावाखाली लष्करात भरती केलं
नोकरी देण्याचे कबूल करून अजयला रशियाच्या लष्करामध्ये भरती करण्यात आले. त्याला तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्याचेही कबूल केले होते. पण, प्रशिक्षण न देताच थेट युद्धात लढवण्यासाठी पाठवण्यात आले. अजय सोबत त्याचे साथीदारही होते.
अजयचा व्हिडीओ व्हायरल
रशियात मरण पावलेल्या अजयचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात तो त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगत आहे. 'आम्हाला जबरदस्ती युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवले जात आहे. हा माझा कदाचित शेवटचा व्हिडीओ असू शकतो. आमच्यावर युक्रेनच्या लष्कराकडून मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले केले जात आहे. या हल्ल्यात माझा एक सहकारी मारला गेला आहे. दोन साथीदार पळून गेले आहेत', असे अजय या व्हिडीओत सांगत आहे.
अजयसोबत संपर्क तुटल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आधी जिल्हाधिकारी कार्यालय, नंतर पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला होता. पण, आता त्यांना अजयचा मृतदेह मिळाला आहे. अजयचा युक्रेन-रशिया युद्धात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बुधवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्यानंतर तो बिकानेरला नेण्यात आला. अजयच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्याच्या आईवडील, कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.