असे मोडायचे हेरगिरीचे कंबरडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:39 IST2025-05-25T10:39:51+5:302025-05-25T10:39:51+5:30
मुद्द्याची गोष्ट : अतिशय चाणाक्षपणे दुसऱ्या देशात आपले हेर पेरणे, गोपनीय माहिती मिळवणे हे सर्व उद्योग जगात सुरूच असतात. भारत-पाकिस्तानच्या बाबतीत हे आता अधिक प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. का करतात लोक हेरगिरी? अशा देशद्रोही लोकांचे करायचे तरी काय?

असे मोडायचे हेरगिरीचे कंबरडे
समीर परांजपे, मुख्य उपसंपादक
काळ, वेळ, तंत्रज्ञान कोणतेही असो त्याचा अतिशय चाणाक्षपणे उपयोग करून दुसऱ्या देशात आपले हेर पेरणे, तेथील गोपनीय माहिती मिळवणे हे सर्व उद्योग जगात सुरूच असतात.
इंटरनेटच्या सध्याच्या जमान्यात यूट्युबर ही जमात अवतरली आहे. त्यातील एक ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडण्यात आले. तिला आपल्या गैरकृत्यांचा अजिबात पश्चाताप होत नाही, अशाही बातम्या आल्या होत्या. आपल्या देशाशी गद्दारी करण्याची वृत्ती नेमकी कोणात बळावते? याची दोन स्पष्ट कारणे आहेत. पाकिस्तानकडून भारतीयांची माथी भडकवणारा प्रचार सातत्याने सर्व माध्यमांतून होत असतो. त्याला बळी पडलेल्या लोकांचा हेरगिरीसाठी वापर केला जातो किंवा हेरगिरी केल्याने जे खूप पैसे मिळतात, त्या लोभापायी तसेच झटपट पैसे मिळवण्यासाठी काही जण हेरगिरीचे काम करतात.
ज्योती मल्होत्रा या यूट्युबरबद्दलच्या सर्व बातम्या पाहिल्या तर असे दिसते की, ती पैशाच्या मोहाला अधिक बळी पडली असावी. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या एहसान-उर-रहिम ऊर्फ दानिश या पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या ती नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत संपर्कात होती. ज्योती यूट्युबर असल्याने देशातील विविध ठिकाणांना भेट देऊन तेथील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत होती. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला हवी असलेली संवेदनशील माहिती ती अनायासे या माध्यमातून पुरवत होती. त्यामुळे तिच्यावर कोणी पटकन संशय घेण्याचा प्रश्न नव्हता. दानिशची भारतीय गुप्तहेर यंत्रणांकडून चौकशी सुरू झाल्यानंतर ज्योतीचे गैरप्रकार उघडकीस आले. या प्रकरणी आणखी काही लोकांना तपास यंत्रणांनी अटक केली आहे.
१४ लोकांना गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानला संवेदनशील माहिती लीक करणे किंवा जासूसी करण्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. हेरगिरी करून भारताची संवेदनशील माहिती शत्रुराष्ट्राला पुरविण्याची वृत्ती ठेचायची असेल तर त्यासाठी कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
सामान्यांना पैसे किंवा महिलेच्या जाळ्यात अडकवून भारतातील संवेदनशील माहिती मिळवितो पाकिस्तान
याआधीही आणखी काही अशी प्रकरणे घडली आहेत की, आपल्याच देशाचे नागरिक शत्रूसाठी हेरगिरी करण्यासाठी तयार होतात. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी याआधीही अशा अनेक उचापती केल्या आहेत. पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांना बनावट पासपोर्ट, बनावट नावे देऊन तो देश आपल्या विविध दुतावासांमध्ये नियुक्त करतो. त्यांना तिथे पाठविण्याआधी हेरगिरी कशी करायची, याचे नीट प्रशिक्षण दिले जाते. पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसाकरिता अर्ज करणाऱ्या भारतीय लोकांमधून हेरगिरीसाठी लोक निवडले जातात.
हेरगिरीचे अनेक प्रकार आहेत. त्यात सर्वात भुरळ पाडणारा प्रकार म्हणजे हनी ट्रॅपिंगचा. भारतीय लष्कर, महत्त्वाच्या संरक्षण, विज्ञान संस्थांमध्ये, लष्करात कार्यरत असलेल्या लोकांना एखादी महिला सोशल मीडियावर मैत्रीची विनंती पाठवते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर जो पुरुष आहे तो अनेकदा भुलतो. यालाच ‘हनी ट्रॅपिंग’ असे म्हणतात. मग त्याच्याकडून देशाबद्दलची संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्रांचे हस्तक काढून घेतात. पुरुष महिलेच्या पाशात अडकून हेरगिरी करतो, अशी खूप प्रकरणे आहेत.
पण महिला पुरुषपाशात अडकून अशी गैरकृत्ये करते, अशी उदाहरणे कमी आहेत. ज्योती मल्होत्रा हे वेगळ्या अर्थाने पुरुषी हनी ट्रॅपचे उदाहरण आहे. सोशल मीडियामुळे आता माहिती हस्तांतरणाची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. या सगळ्या गोष्टी करत असतानाच पाकिस्तान सामान्य माणसांनाही हाताशी धरून भारतात ‘स्लीपर सेल’ उघडतात. या लोकांकडूनही संवेदनशील माहिती मिळवली जाते.
हेरगिरी रोखण्यासाठी काय करावे?
पाकिस्तानची भारतातील हेरगिरी रोखण्यासाठी उचललेली पावले व अजून काय उपाययोजना करायच्या, याबद्दल केंद्र सरकार नक्कीच खल करत असणार. पण जगभरातील गुप्तचर यंत्रणांच्या कार्यशैलीबद्दल वाचल्यानंतर असे लक्षात येते की, कोणत्याही देशात शत्रूकडून जो विखारी, जातीय, भडक स्वरूपाचा प्रचार सुरू असतो, त्याला आपल्या देशातील लोकांनी बळी पडू नये व त्यांनी राष्ट्रविघातक कृत्ये करू नयेत, यासाठी सरकारने दक्ष राहिले पाहिजे.
सुरक्षा यंत्रणा मजबूत करा
कोणत्याही देशात हेरगिरी केवळ सोशल मीडियाद्वारेच होत नाही तर उपग्रहांमार्फत, खबऱ्यांमार्फत म्हणजे पारंपरिक पद्धतीनेही केली जाते. हेरगिरीचे विविध मार्ग शोधले जातात, नवीन माणसे त्या कामासाठी हेरली जातात. हे चक्र सुरूच असते. आपल्यात भेदी निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक देशाने आपली सुरक्षा यंत्रणा अधिक बांधीव, मजबूत करणे आवश्यक असते.