‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:22 IST2025-09-07T16:19:27+5:302025-09-07T16:22:06+5:30
'इतक्या घाईघाईत केलेल्या या दौऱ्यातून काय साध्य होणार आहे?'

‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी मणिपूरचा दौरा करणार आहेत. राज्यातील हिंसाचार सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. यावर सर्व राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसने या दौऱ्यावरुन सरकारवर बोचरी टीका केली. काँग्रेसने म्हटले की, '२९ महिन्यांनंतर पंतप्रधान मणिपूरला जात आहेत, पण फक्त ३ तास तिथे घालवणार! हा मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे.'
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका करताना म्हटले की, '१३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या प्रस्तावित मणिपूर दौऱ्याचे त्यांच्या समर्थकांकडून स्वागत केले जात आहे, परंतु ते राज्यात फक्त ३ तास घालवणार आहेत. इतक्या घाईघाईत केलेल्या या दौऱ्यातून काय साध्य होणार आहे? हा राज्यातील लोकांचा अपमान आहे. त्यांनी २९ वेदनादायक महिने पंतप्रधानांची वाट पाहिली आहे. यामुळे मणिपूरच्या लोकांबद्दल त्यांची उदासीनता आणि असंवेदनशीलता दिसून येईल,' अशी बोचरी टीका जयराम रमेश यांनी केली.
The proposed visit of the Prime Minister to Manipur on Sept 13 is being hailed by his cheerleaders.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 7, 2025
But it appears that he will be spending just about 3 hours--yes just 3 hours--in the state. What does he hope to accomplish by such a rushed trip? This is actually an insult to… pic.twitter.com/Yvbd5MXH8q
आता पर्यटनाची वेळ आली आहे, म्हणून...
काँग्रेस व्यतिरिक्त शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील पीएम मोदींच्या दौऱ्यावर टीका केली. ते म्हणाले, 'जर ते मणिपूरला जात असतील, तर त्यात मोठी गोष्ट काय? ते पंतप्रधान आहेत, ते दोन-तीन वर्षांनी तिथे जात आहेत. जेव्हा मणिपूर जळत होते, हिंसाचार भडकला होता, तेव्हा त्यांना जाण्याची हिंमत झाली नाही. आता मोदींनी पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली आहे, म्हणून ते पर्यटनासाठी तिथे जात आहेत.'
हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू
मणिपूरमध्ये हिंसाचाराला २९ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. इतक्या दिवसांनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. येथील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षात २६० हून अधिक लोक मारले गेले आहेत अन् हजारो लोक बेघर झाले आहेत. मेईतेई समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीने या संघर्षाला खतपाणी घातले होते. ज्याला कुकी आणि इतर आदिवासी समुदाय विरोध करतात.