राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना महाकुंभ मेळ्याबद्दल एक विधान केले. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना लालूंनी महाकुंभ अर्थहीन असल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपने टीका केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. शनिवारी धावपळ झाल्याने चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना लालू प्रसाद यादव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली.
लालू प्रसाद यादव महाकुंभबद्दल काय बोलले?
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याबद्दल लालू प्रसाद यादव यांना प्रश्न विचारण्यात आला होता. महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी होत असल्याच्या मुद्द्यावर लालू प्रसाद यादव म्हणाले, 'अरे या सगळ्या कुंभचा काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे.'
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे -लाल प्रसाद यादव
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना लालू प्रसाद यादव म्हणाले, 'खूपच वाईट घटना घडली आहे आहे. सगळ्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. ही रेल्वेची चूक आहे. रेल्वेच्या अव्यवस्थापनामुळे आणि हलगर्जीपणामुळे इतक्या लोकांचा जीव गेला. या घटनेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे', अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली.
लालू प्रसाद यादव यांच्या भाजपची टीका
भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभबद्दल केलेल्या विधानावर टीका केली. 'लालू प्रसाद यादव यांनी सनातनचा अपमान केला आहे. त्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर इतकी मोठी दुर्घटना घडली. अनेक लोकांचे जीव गेले. पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. लालू प्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण विरोधकांनी संवेदनशील होऊन बोललं पाहिजे', असे भाजपचे नेते हुसैन म्हणाले.