'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:03 IST2026-01-01T12:00:18+5:302026-01-01T12:03:29+5:30
'समाजातील प्रभावशाली लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील मंदिर, मठ, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्व हिंदूंकरिता खुले आहेत, याची खात्री करावी. या विषयांवर कोणताही संघर्ष किंवा हिंसा होऊ नये.'

'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी भेदभाव आणि अलगावाच्या भावना संपवण्याचे आवाहन केले आहे. छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील सोनपैरी गावात झालेल्या हिंदू संमेलनात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मंदिर, मठ, तलाव, विहिरी तसेच स्मशानभूमी या सर्व सुविधा कोणीही बांधल्या असल्या तरी त्या सर्व हिंदूंकरिता खुल्या असाव्यात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भागवत म्हणाले की, लोकांचे मूल्यांकन जात, संपत्ती, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारे होऊ नये. हा देश सर्वांचा आहे आणि ही भावना म्हणजेच खरा सामाजिक सलोखा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सामाजिक सलोख्यावर भर
आपल्या भाषणात सरसंघचालकांनी सांगितले की, सामाजिक सलोख्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे भेदभाव आणि विभाजनाच्या मानसिकतेला दूर करणे. आपण ज्या परिसरात राहतो, तिथे सर्व हिंदू आपले मित्र असले पाहिजेत. जात, भाषा, प्रांत किंवा संप्रदाय यांवरून जे फरक दाखवले जातात, त्या सर्व लोकांशी मैत्रीचे नाते निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.
आयुष्यात अमलात आणावयाच्या पाच गोष्टी
भागवत पुढए म्हणाले की, केवळ आध्यात्मिक चर्चांपुरते विचार मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे आवश्यक आहे. त्यांनी पाच महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या
सामाजिक सलोखा जोपासणे
कुटुंबव्यवस्था मजबूत करणे
स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार
शिस्तबद्ध नागरिक जीवन
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी
मंदिर, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्वांसाठी
संघप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले की, समाजातील प्रभावशाली लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील मंदिर, मठ, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्व हिंदूंकरिता खुले आहेत, याची खात्री करावी. या विषयांवर कोणताही संघर्ष किंवा हिंसा होऊ नये. सामाजिक कार्य म्हणजे एकतेचा प्रयत्न असतो, संघर्षाचा नव्हे, असे त्यांनी नमूद केले.
कुटुंब, एकाकीपणा आणि समाज
एकाकीपणावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, जेव्हा व्यक्ती एकटी पडते तेव्हा ती चुकीच्या सवयींकडे वळण्याची शक्यता वाढते. कुटुंबातील नियमित संवाद आणि एकमेकांशी बोलणे हे यावर प्रभावी उपाय ठरू शकते. देश धोक्यात असेल, तर कुटुंबही सुरक्षित राहू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त करत भागवत यांनी पाणी बचत, पावसाचे पाणी साठवणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि अधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. घरापासूनच पर्यावरण संरक्षणाची सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले.