चोरांचा झाला पोपट; बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याची बॅग पळवली, 5 रुपयांची नोट सापडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:40 IST2018-08-09T16:30:52+5:302018-08-09T16:40:16+5:30
गांधी नगर येथून बाईकस्वारांनी 20 लाखांची धाडसी चोरी केली. मात्र, चोरी करण्यात आलेल्या बॅगेत केवळ 5 रुपये मिळाल्याने चोरट्यांनाही धक्काच बसला.

चोरांचा झाला पोपट; बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याची बॅग पळवली, 5 रुपयांची नोट सापडली!
नवी दिल्ली - येथील गांधी नगर येथून बाईकस्वारांनी 20 लाखांची धाडसी चोरी केली. मात्र, चोरी करण्यात आलेल्या बॅगेत केवळ 5 रुपये मिळाल्याने चोरट्यांनाही धक्काच बसला. स्कुटीवरुन जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या बॅगेत 20 लाख रुपये असल्याची माहिती संबंधित चोरट्यांना होती. त्यामुळे रिस्क घेऊन चोरट्यांनी बॅगसहित स्कुटीही पळवली. मात्र, चोरट्यांना त्या बॅगेत फक्त 5 रुपये मिळाले. 26 मे रोजी ही घटना घडली होती.
शाहदरा जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने या चोरट्यांना अटक केली आहे. तसेच या चोरट्यांकडून स्कुटीही जप्त करण्यात आली आहे. 26 मे रोजी एक व्यवसायिक आपल्या स्कुटीवरुन एका बॅगेसहित प्रवास करत होता. त्यावेळी, एका बाईकवरील तिघांनी सैनि एंकलेव येथे व्यापाऱ्यास अडवले. त्यानंतर व्यापाऱ्याकडून जबरदस्तीने स्कुटी आणि बॅगही लुटण्यात आली. व्यापाऱ्याने विरोध केला असता, त्यास बंदुकीचा धाक दाखवून गोळी मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्याने भीतीपोटी बॅग आणि स्कुटी चोरट्यांच्या हवाली केली. याप्रकरणी विशेष पथकाचे पोलीस हिरालाल, एसआय पवन आणि त्यांच्या टीमने इफ्तेखार(35) आणि सुहैब(23) या दोघांना अटक केली आहे. इफ्तेहारने या चोरीच्या घटनेचा मास्टर प्लॅन आखल्याची कबुली त्याने दिली. व्यापाऱ्याच्या बॅगेत 20 लाख रुपयांची रोकड असल्याचा अंदाज इफ्तेहारला होता. त्यामुळे या लुटीचा डाव आखल्याचेही इफ्तेहारने पोलीस तपासात सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांकडून व्यापाऱ्याला स्कुटी आणि बॅग परत मिळवून दिली आहे.