नोकरी देण्याच्या बहाण्याने तीन व्यावसायिकांनी तीन तरुणींसोबत विकृत खेळ करून त्यांचं शोषण केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत तिन्ही तरुणींनी शोषणाचे आरोप केल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासामध्ये हलगर्जीपणा केल्याचंही निष्पन्न झालं आहे.
या तरुणींच्या लैंगिक शोषणा प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कुठळीही वैद्यकीय चाचणी केलेली नाही. तसेच कुठलेही जबाबही नोंदवून घेतलेले नाहीत. दरम्यान, पीडित मुलींची वैद्यकीय चाचणी बुधववारी केली जाईल, तसेच दंडाधिकारी त्यांचे जबाब नोंदवून घेतले जातील, असे या प्रकरणाचा तपास करत असलेले सीओ राजीव कुमार यांनी सांगितले. मात्र पीडित तरुणींनी या प्रकरणी पुरावे असलेले पेन ड्राईव्ह दिल्यानंतरही पोलिसांनी कारवाई करण्यासाठी एवढा उशीर का केला, असा प्रश्न उपस्थित होत. आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक महितीनुसार नोकरी देण्याच्या बहाण्याने शहरातीली तीन व्यापाऱ्यांनी आपलं शोषण केल्याचा आरोप तीन तरुणींनी केला होता. तसेच या प्रकरणी २२ मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी या तरुणींनी आरोपींविरोधात पुरावे असलेला पेन ड्राईव्हसुद्धा पोलिसांकडे दिला होता. मात्र जवळपास दोन दिवस पोलिसांनी टाळाटाळ केली. तसेच तिसऱ्या दिवशीही तरुणींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. पीडित मुलींपैकी एक तरुणी अनुसूचित जाती तर दोन तरुणी मुस्लिम समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित तरुणींनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आरोप करताना म्हटलं आहे की, आशिष आग्रवाल, स्वतंत्र साहू आणि लोकेंद्र सिंह चंदेल या तीन व्यापाऱ्यांनी आमचं शोषण केलं. तसेच आमचे अश्लील व्हिडओ तयार केले. हे व्हायरल करण्याची धमकी ते आम्हाला सतत द्यायचे. एवढंच नाही तर आरोपी आम्हाला जबरदस्तीने बियर आणि सिगारेट प्यायला लावायचे. तसेच आम्हाला विवस्त्र करून डान्स करायला लावायचे. दरम्यान, आरोप झालेल्या तीन आरोपींपैकी एक आरोपी असलेल्या आशिष अग्रवाल यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला या प्रकरणात फसवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर इतर दोन व्यापाऱ्यांनी मात्र आपले फोन बंद ठेवून प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.