लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:12 IST2025-12-19T18:12:07+5:302025-12-19T18:12:53+5:30
Madhya Pradesh News: लाडाकोडात वाढवलेल्या आणि खूप शिकवलेल्या मुलीने एका तरुणासोबत पळून जाऊन लग्न केल्याने संतापलेल्या कुटुंबीयांनी जिवंतं मुलीला मृत समजून तिची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. एवढंच नाही तर स्मशानात जाऊन अंत्यसंस्काराचे विधीही पार पाडले.

लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा
मध्य प्रदेशमधील विदिशा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडाकोडात वाढवलेल्या आणि खूप शिकवलेल्या मुलीने एका तरुणासोबत पळून जाऊन लग्न केल्याने संतापलेल्या कुटुंबीयांनी जिवंतं मुलीला मृत समजून तिची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. एवढंच नाही तर स्मशानात जाऊन अंत्यसंस्काराचे विधीही पार पाडले.
ही घटना विदिशामधील चुनावाली गली येथील आहे. येथील सविता कुशवाह नावाच्या तरुणीने बरईपूरा येथील रहिवासी असलेल्या संजू रजक नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला. मात्र हे लग्न सविता हिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यात संजू रजक हा सविताचा भाऊ सौरम कुशवाह याचा मित्र होता. याच संजूने ११ डिसेंबर रोजी सविताला पळवून नेले. त्याबाबत कुटुंबीयांनी १३ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी सविता हिने पोलिसांसमोर हजर होत आपण स्वखुशीने गेल्याची आणि संजू रजक याच्यासोबत भोपाळमधील आर्य समाज मंदिरात लग्न केल्याचा जबाब नोंदवला.
कुटुंबीयांनी सविता हिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. तिला समाज आणि नातेसंबंधांचं कारण देत समजावून पाहिले, पण ती ऐकली नाही. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी ती आपल्यासाठी मेली असे समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करम्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांना शोक व्यक्त करत सविता हिचा पुतळा तयार करून त्याची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत नातेवाईक आणि शेजारीपाजारीही सहभागी झाले. घरापासून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढल्यानंतर सविता हिच्या पुतळ्यावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. एवढंच नाही तर आता तिचं तेरावं घालून गंगा नदीवर जाऊन पिंडदान करणार असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, सविता हिचा भाऊ राजेश कुशवाह याने सांगितले की, माझी बहीण २३ वर्षांची आहे. तिला खूप लाडात वाढवलं. शिकवलं. मात्र तिने आई-वडील आणि कुटुंबीयांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. तिने ज्या तरुणासोबत लग्न केलं तो चांगला नाही आहे. तो व्यसनांच्या आहारी गेलेला आहे. आम्ही तिची खूप समजूत घातली. आई वडिलांना हातापाया पडून विनवणी केली. पण तिने ऐकलं नाही. म्हणून आम्ही तिच्यावर अंत्यसंस्कार केले. आता तिचे आणि आमचे काहीही संबंध उरलेले नाहीत. तिला कधी परत यायचं असेल तरीही आम्ही तिला स्वीकारणार नाही.