होडीत भेटले, प्रेमात पडले, तिच्यासाठी राहुल बनला मुर्शाद, पण प्रेमकहाणीचा झाला भयानक शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:25 IST2025-02-19T13:24:14+5:302025-02-19T13:25:20+5:30
Uttar Pradesh Crime News: जाती, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्या भिंती ओलांडून सुरू होणाऱ्या काही प्रेमकहाण्यांचा भयानक शेवट झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. धर्माच्या भिंती ओलांडून सुरू झालेल्या एका प्रेमकहाणीचा भयावह शेवट झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे.

होडीत भेटले, प्रेमात पडले, तिच्यासाठी राहुल बनला मुर्शाद, पण प्रेमकहाणीचा झाला भयानक शेवट
जाती, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्या भिंती ओलांडून सुरू होणाऱ्या काही प्रेमकहाण्यांचा भयानक शेवट झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. धर्माच्या भिंती ओलांडून सुरू झालेल्या एका प्रेमकहाणीचा भयावह शेवट झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. येथे एक तरुण आणि तरुणीमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत प्रियकराने प्रेयसीसाठी धर्मांतर करून इस्लाम धर्माचा स्वीकार केला. तरीही प्रेयसीच्या नातेवाईकांनी लग्नास नकार देत तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं. ही बाब खटकल्याने हा तरुण प्रेयसी माहेरी आली असताना तिच्या घरी गेला आणि संतापाच्या भारात चाकूने सपासव वार करून तिची हत्या केली. त्यानंतर चिडलेल्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक ठाण्यातली पोलिसांची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. सद्यस्थितीत पोस्टमार्टेम केल्यानंतर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान, हे प्रकरण दोन समुदायांशी संबंधित असल्याने पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राहुल याची २०२२ मध्ये जकरीन नावाच्या तरुणीशी भेट झाली होते. रेल्वेच्या परीक्षेसाठी लखनौला जाण्यासाठी राहुल होडीमधून फतेहाबाद येथे जात असताना होडीमध्येच त्यांची नजरानजर झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपापले मोबाईल नंबर दिले. तसेच त्यांचं बोलणं सुरू झालं. पुढे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. राहुल याला जकरीन हिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र दोघांचाही धर्म आड येत होता. त्यामुळे प्रेमासाठी राहुलने आपला धर्म बदलला. तो राहुलपासून मुर्शाद बनला. दाढी ठेवून डोक्यावर टोपी घालू लागला. तसेच त्याने नमाज पढण्यासही सुरुवात केली. जकरीनच्या कुटुंबातील काही जणांनाही त्यांचा विवाह व्हावा, असं वाटत होतं. मात्र काही नातेवाईकांना त्यात मोडता घातला.
मुंबईत नोकरी करत असलेला राहुल अधुनमधून गावी यायचा. तेव्हा लपून छपून हे दोघेही भेटत असत. मात्र गतवर्षी डिसेंबर महिन्यात जकरीनच्या कुटुंबीयांनी तिचा दुसऱ्याच तरुणासोबत निकाह करून दिला. त्यानंतर हल्लीच जरकीन ही माहेरी आली होती. तर राहुलही गावी गेला होता. जकरीनच्या विवाहामुळे तो संतापला होता. तसेच त्याने कथितपणे जकरीन हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, राहुल याच्या वडिलांनी जकरीन हिच्या कुटुंबीयांवरच हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, राहुलला फोन करून बोलावण्यात आलं. त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. तसेच जकरीन हिची हत्याही तिच्याच कुटुंबीयांनी केली, असा दावाही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, राहुल आमचा एकुलता एक मुलगा होता. आमच्या दोन मुलींचा विवाह झालेला आहे. राहुल मुंबईमध्ये एका मिठाईच्या दुकानात काम करत होता. त्याने धर्मांतर केल्याने गाववाले नाराज झाले होते. तसेच आमच्या कुटुंबाला टाळत होते. आता राहुलचीच हत्या झाली आहे.